विनायक बेटावदकर
गणपती उत्सवापूर्वी सुमारे पंधरा दिवस, गणपती उत्सवात कल्याण शहर, ग्रामीण भागाचे हवामान साधारण दमट होते. सध्याही ते तसेच असल्याने अधून मधून पावसाचा शिडकावा होतच असतो. त्याचा परिणाम शहराच्या आरोग्यावर झालेला दिसतो. बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य बिघडलेले दिसते. शहरात मलेरियाचे डास खूप मोठ्या प्रमाणावर झाले असले तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डास निर्मुलनासाठी कोणतीही परिणामकारक प्रतिबंधात्मक उपाययोजना केलेली दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे.
कल्याण शहरासह ग्रामीण भागात पाण्यापासून होणाऱ्या आजारांचा धोका वाढला आहे. कल्याण महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालायाच्या सर्व केंद्रात सर्दी ताप व पावसाळी आजारावर भरपूर औषधे असल्याचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने दावा केला आहे. महापालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये श्रीमलंगपट्टी मुरबाड, शहापूर, भागातील रुग्ण अधिक आढळतात. कल्याण, उल्हासनगर व त्यांच्या भोवतालच्या ग्रामीण भागात थंडी-तापाचे रुग्ण आढळले असले तरी त्यात पाण्यापासून होणाऱ्या तापाची संख्या अधिक आहे. शहरातील खासगी रुग्णालयेही थंडी-तापाच्या रुग्णांनी भरलेली दिसतात, महापालिका व शासनातर्फेही नागरिकांनी थंडीताप आल्यास तो ‘किरकोळ ताप’ म्हणून अंगावर काढू नये. किवा स्वत:च्या मनाने तापावरच्या गोळ्या घेऊ नयेत असे आवाहन केले आहे. त्याबरोबरच पावसात भिजू नये, ओले कपडे अंगावर वाळवू नये, डासांपासून संरक्षण मिळावे म्हणून घरात योग्य प्रमाणात जंतूनाशकाचा वापर करायला हरकत नाही. पण तो करताना लहान मुले त्यापासून दूर ठेवण्याची काळजी घ्यावी, मुलांच्या अंगात उबदार कपडे घालावेत. आजारी मुलांजवळ अन्य मुलांना जाऊ देऊ नये. त्यांचा संसर्ग झाला तरी मुलांना बाधा होऊ शकते.
काही दवाखान्यात मुलांसाठी जंतूनाशक औषधे, गोळ्या विनामूल्य मिळतात. त्यांचा वापर करण्यास हरकत नाही. सध्याच्या अतिपावसामुळे चिकनगुनिया, डेंग्यू, या तापाचे प्रमाण वाढले असल्याने मुलांना त्यापासून जपणे फार जरुरीचे आहे. विषाणू जन्य ताप असेल तर घशात खवखव होते, सर्दी खोकल्याने मुलं बेचैन होतात, त्यांना अशक्तपणा देतो. डेंग्यू, चिकनगुनियाच्या तापात रुग्णाला सतत उलट्या होतात, पोटात दुखते, खोकला येतो. दम लागतो. अशावेळी त्याला बाहेर जाऊ देऊ नये. घरातच झोपवून ठेवावे. वेळ न घालवता रुग्णालयात नेऊन औषधे द्यावीत.याप्रकारे सध्याच्या वातावरणात प्रत्येकानेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.