लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. भाड्याच्या घरात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. ही तरुणी वाराणसीतील चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गढवाली टोला परिसरात वास्तव्यास होती. ती मूळची रोमानियाची रहिवासी आहे. फिलिप फ्रान्सिका असे तिचे नाव आहे. भारतीय तत्त्वज्ञान या विषयात ती पीएचडी करत होती.
फ्रान्सिका राहात असलेल्या खोलीचा दरवाजा शुक्रवारी रात्री बराच वेळ उघडला नाही. त्यामुळे घर मालकाने स्थानिक पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घर मालकाकडे असलेल्या डुप्लिकेट चावीने दार उघडले. तेव्हा फ्रान्सिकाचा मृतदेह तिच्या बिछान्यात आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, फ्रान्सिकाची मानसिक स्थिती ठीक नव्हती. पण तिच्या आजारासंबंधीची कोणतीही औषधे खोलीत सापडलेली नाहीत. खोलीत कोणत्याही प्रकारची चिठ्ठीदेखील आढळून आलेली नाही. फ्रान्सिकाला लहानपणापासूनच फिट येण्याचा त्रास होता. त्यासाठी ती उपचार घेत होती. सध्या पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहात आहेत. फ्रान्सिकाकडे २०२७ पर्यंतचा व्हिसा होता. ती बऱ्याच कालावधीपासून वाराणसीमध्ये राहात होती. त्याआधी ती सूरत आणि अमृतसरमध्ये अभ्यासासाठी वास्तव्यास होती. फ्रान्सिका जिथे भाड्याने राहात होती, तिथे अन्य व्यक्तीही भाड्याने राहत आहेत. घटनेची माहिती रोमानियाच्या दूतावासाला देण्यात आली आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील ज्या विभागात अभ्यास करत होती, त्या विभागाला तिच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे.