जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने भरलेल्या नाल्यात एक कार पडली. या अपघातात कारमधील सात जणांचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास एका तरुणाने नाल्याच्या पाण्यात एक कार बुडलेली पाहिली आणि पोलिसांना माहिती दिली. यावर पोलिस उपायुक्त दक्षिण राजर्षी राज वर्मा आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. कार नाल्यातून बाहेर काढण्यात आली आणि मृतदेह शवगृहात ठेवण्यात आले. रिंग रोडवर कार अनियंत्रित झाली आणि सोळा फूट खाली असलेल्या अंडरपासमध्ये भरलेल्या पाण्यात पडली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
शिवदासपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी सुरेंद्र कुमार सैनी यांनी सांगितले की, जयपूरच्या फुलियावास केकरी आणि वाटिका येथील रहिवासी काळुराम यांच्या वडिलांच्या निधनानंतर दोन कुटुंबातील सात जण हरिद्वारला गेले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व लोक हरिद्वारमध्ये अस्थी विसर्जन करून घरी परतत होते. मृतांमध्ये रामराज वैष्णव, त्यांची पत्नी मधु आणि मुलगा रुद्र आणि नातेवाईक काळुराम, त्यांची पत्नी सीमा आणि मुलगा रोहित आणि गजराज यांचा समावेश आहे.