मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने मुंबईकर मात्र हैराण झालाय. पुढील तीन तास जोरदार वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
तसेच घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच पडा असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ठाणे, तसेच नवी मुंबईत पावसाने जोर धरला आहे. येथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी ठाण्याच्या कल्याण,डोंबिवलीसह काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसला.
मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी भागात रविवारी मुसळधार पावसाचा, तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस राज्यातील नागरिकांना उन्हाचा ताप आणि उकाडा सहन करावा लागत होता. मुंबईतचही अशीच परिस्थिती होती. दरम्यान, उपनगरांतील दहिसर, बोरिवली, कांदिवली परिसरात शनिवारी सकाळी जोरदार पाऊस पडला.मुंबईतही शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शनिवारी २९ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.