संस्कृतीचा गोडवा : पूर्णिमा शिंदे
नामस्मरण, नामजप एक श्रद्धास्थान आपल्या लाडक्या देवाचे स्मरण करणे होय. सतत मनामध्ये असणारी शुद्ध भावना आपल्या अवतीभोवतीचा एक वलय निर्माण करते. पुण्यसंचय करते आणि शरीर व मन यांचा मेळ घालते. यासाठी नामस्मरणाचा संकल्प करावा लागतो. अवतीभोवतीचे वातावरणदेखील अंदाधुंदीचे असले तरीदेखील त्यावर मात करून स्वतःचा तोल सांभाळावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे स्वतः इंद्रियांवर विजय मिळविणे, मनःशांती मिळविणे, आत्मविश्वास वाढणे, नैराश्य, ताणतणाव दूर करणे, कंटाळा, आळस, दुःख दूर पळून लावणे पण एकाग्र करून मनोबल वृद्धी करणे आत्मबल वाढवून सकारात्मकता आणणे, संकटांशी सामना करणे, प्रतिकार करणे देवस्थ तारत असतो. आपण जर देवाची आराधना, साधना केली, मनोभावे जप केला तर निश्चित आपल्याला संयम शांती लाभते. काष्टी पाषाणी तोच आहे. देवाशी एकरूप व्हायला हवं. भक्ती रंगात न्हाऊन निघाल्यासारखं. पूर्वीच असे ऐतिहासिक पौराणिक दाखले म्हटलं तर संत महंत सुद्धा या नामस्मरणात अखंड बुडाले असायचे. जगद्गुरू तुकोबाराय यांनी म्हटलं आहे की, ‘भाव तैसे फळ, न चाले देवापाशी बळ’ जसा भाव तसा देव भक्तिभावाने पुजा केली, तर निश्चित देव प्रसन्न होतो. उदाहरणार्थ भक्त प्रल्हादाला सुद्धा त्याच्या पित्याने तापत्या तेलाच्या कढईमध्ये शिक्षा दिली. कारण प्रल्हाद सतत देवाचे नामस्मरण करत असे. त्यामुळे प्रल्हादाचा नामजप ऐकून राजाला चिड निर्माण होत असे. देव धावून आला ना षडरीपुंचा त्याग करून. एकच नाम सदा ओठी म्हणजे नामजप. रजोगुण, तमोगुण यांचा अतिरेक वाढला की वासना विषयाची जोड मानवी जीवनाला नष्ट करते आणि तो पुरता विसरूनच जातो की मी माणूस आहे. मग त्या माणसाचं जगणं, वागणं बदलत जातं. माणूस म्हणून आपल्याला नक्कीच जगण्याचं भान निर्माण होण्यासाठी देवाच्या पायी लीन व्हावं लागतं. हा भक्तिमार्ग परमार्थ, अध्यात्म, सत्संग सगळ्यांनाच खूप काही देऊन जातो. जीवन भलं करून जातो. सैरभैर धावणाऱ्या मनाला लगाम घालायला लावतो.
मन हे सैरावैरा धावणारे, चंचल, अवगुणी असते. त्याचा स्वभाव विषय अधीन मायारूपी हव्यासी स्वार्थी असतो. पण भक्ती ही मात्र त्याला निरलस निस्वार्थी, निस्पृह, निरपेक्ष बनवते. सद्गुणी बनवते. या साधनेमुळे माणूस सुलाखून निघतो. निर्मोही होतो. देवाचे ध्यान त्याला आनंदी ठेवते. त्या भक्तीचे तेज त्याच्या चेहऱ्यावर अंतकरणातली श्रीमंती एकूणच त्याच्या वागण्या- बोलण्यामध्ये दिसून येते.
संत एकनाथांच्या भारुडामध्ये विंचू चावला म्हटले आहे ते याच रूपाने. आपल्या आजूबाजूला अनेकजण दंश करणारे विंचू असतात. प्रपंचात मात्र या अडचणी तो हव्यास ती माया निर्माण करते. त्या कधीही न संपणाऱ्या असतात. पण जर परमार्थाची कास धरली तर आनंद हा ओसंडून वाहणारा आणि पदोपदी प्रगती करणारा असतो. पुण्याचा संचय करतो. ध्यानीमनी असा नामस्मरणाचा सेतू जीवनाची नौका पैलतीरी पोहोचवितो. ज्ञानियाचा राजा संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. संत मुक्ताई चांग देवांची गुरू झाली. संत जनाबाईच्या घरी तिला विठू-माउली साथ देत होती. संत सखुबाईच्या घरी जातं दळून पीठ कांडीत होती, तर संत सावता माळ्याच्या शेतामध्ये त्या नामस्मरणातूनच भाजी पिकत होती. गोरा कुंभाराच्या चिखलातून त्याचे स्वतःच बाळ पायाखाली गेलं. तरी त्याचं नामस्मरण मात्र सुटलं नाही. देव प्रसन्न झाला. ही आहे नामस्मरणाची ताकद, ऊर्जा बळ! गौतम बुद्धांनी बोधी वृक्षाखाली तपश्चर्या केली मन एकाग्र केले आणि अवघ्या जगाला शांती अहिंसेचा संदेश दिला. आपले अवघे मानवी जीवन श्रीमंत केले. नाममंत्र कोणताही असो. आपल्या इष्ट देवतेची प्रार्थना मनापासून केली, तर आपल्याला त्याचे निश्चित फळ, पुण्य लाभते. मन एकाग्र होते आणि जीवन जगण्याची नावीन्यपूर्ण, आनंददायी, पहाट उजाडते.