न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त
नवी मुंबई: न्हावा शेवा बंदरातून डीआरआयने पाकिस्तानी बनावट असलेले कोट्यवधी रुपयांचे सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर वाहून नेणारे २८ कंटेनर जप्त केले आहेत.जप्त केलेल्या मालाची किंमत १२ कोटी रुपये आणि त्याहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे.
एका पोलिस अधिकाऱ्याने ही माहिती एका वृत्तसंस्थेला दिली. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवर सरकारने लादलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करून तीन भारतीय आयातदारांनी ही खेप खरेदी केली होती. दुबईतील एक भारतीय नागरिक, जो कमिशन आधारावर काम करत होता. त्याने बनावट पावत्या जारी करून पाकिस्तानातून सुक्या खजूरांचे ट्रान्सशिपमेंट सुलभ केले. यासाठी, त्याने समुद्री वाहतूक मार्ग लपविण्यासाठी त्याच्या कंपन्यांचा वापर केल्याचा आरोप आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कंटेनर दुबईच्या जेबेल अली बंदरातून युएईची निर्मिती असल्याचे घोषित करून पाठवण्यात आले होते. हा माल भारतीय आणि युएई नागरिकांशी व्यवहार करण्यासाठी पाठवण्यात आला होता. सध्या या वस्तूंच्या पुरवठादाराला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, मूळ देशाची चुकीची माहिती देऊन पाकिस्तानमधून सौंदर्यप्रसाधनांच्या तस्करीत मदत केल्याबद्दल एका कस्टम ब्रोकरलाही अटक करण्यात आली आहे.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने २ मे रोजी पाकिस्तानी वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर पूर्ण बंदी घातली आहे. त्यामुळे डीआरआयने बंदीचे उल्लंघन करणारे आणि शेजारील देशातून आयात केलेल्या वस्तू जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत ही जप्ती करण्यात आली आहे.