
नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होणार आहे. या सामन्याला विरोध म्हणून उद्धव ठाकरे गटाने राजकीय आंदोलन सुरू केले आहे. उद्धव ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते शरद पवार यांनी एक वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भारत - पाकिस्तान सामना हा एका दिवसाचा प्रश्न आहे, फार मोठा मुद्दा नाही. नंतर बघू, असे शरद पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
देशातील आणि राज्यातील सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाशिकमध्ये अधिवेशनाचे आयोजन केले आहे. या अधिवेशनात पक्षाच्या पुढील वाटचालीची आखणी केली जाणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पक्ष सोमवारी नाशिकमध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे शरद पवार म्हणाले. आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना समाजात कटुता निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे शरद पवार म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत बोलताना शरद पवार यांनी सरकारला व्यापक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिला.