पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी तो पुढे सरसावला आहे . यावेळी त्याने पंजाबमधील पूरग्रस्त गावांना भेट दिली असून, बोटीतून प्रवास करताना त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पूरग्रस्त भागात जाताना स्थानिक लोकांनी दाखवलेले आदर आणि प्रेम पाहून सोनू सूद भावूक झाला . त्याने सांगितले की, “आज आम्ही सकाळपासून अनेक गावांना भेट दिली आणि जिथे जिथे गेलो, तिथे लोकांनी अन्न, चहा किंवा दूध देण्याचा आग्रह केला.” पुढे तो म्हणाला , “देशाला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांची पिके पुरामुळे नष्ट झाली आहेत. हे पाणी ओसरेल, पण त्यांची गरज वाढेल. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे.”
सोनू सूद याने शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. “ जो सर्वांना अन्न पुरवतो त्या अन्नदात्याचे ऋण फेडण्याची वेळ आता आली आहे,” असे तो म्हणाला .
पूरग्रस्त भागातील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्यातील सतलज, रावी आणि बियास नद्या दुथडी भरून वाहत आहेत, ज्यामुळे अनेक गावे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूरात आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक बेघर झाले आहेत. सरकारकडून आपत्कालीन अन्न व मदतसामग्रीचे वाटप सुरू आहे.
सोनू सूद यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. रणदीप हुड्डा, सलमान खान, शाहरुख खान, दिलजीत दोसांझ, अम्मी विर्क आणि सोनम बाजवा यांनीही पूरग्रस्तांना मदत केली आहे.