मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज जाहीर केले.
आज सांस्कृतिक विभागातर्फे तज्ञांसोबत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बैठक घेऊन बारव संवर्धन, संरक्षण याबाबत आढावा घेतला. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्राथमिक माहिती जी समोर आली आहे त्यामध्ये राज्यात ऐतिहासिक वारसा असलेल्या आणि पुराणकाळापासून ज्यांच्या नोंदी सापडतात अशा ३,००० च्या वर बारव आहेत.
या सगळ्यामध्ये ऐतिहासिक मूल्य सुद्धा आहेत. ज्या पद्धतीचं स्थापत्यशास्त्र वापरलं आहे, त्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जगामध्ये दुर्मिळ आहे. जलसंवर्धन आणि जलसंधारण याचं कार्यही होतंय. त्या पाण्याची उपयोगिताही झाली पाहिजे. आणि म्हणून राज्यभरातल्या जिल्हा निहाय असलेल्या या सगळ्या बारव आणि त्या बारवाच्या नोंदणी याची आवश्यकता लक्षात येते.
म्हणून या बारव जतन, संवर्धन आणि उपयोगिता याची स्पष्ट उद्दिष्ट्ये आणि हेतूदर्शित केलेला नव्याने शासन निर्णय जारी करण्यात येणार आहे.
या सगळ्यामध्ये शासकीय यंत्रणेतील अधिकारी व जलसंधारणात, ऐतिहासिक वारसा विषयामध्ये काम करणाऱ्या तज्ञांची समिती करण्यात येणार आहे, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.
तसेच पहिल्या टप्प्यात जिल्हा निहाय याचं सर्वेक्षण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये या सगळ्यांचं दस्तावेजीकरण करण्यात येणार आहे. शासकीय नोंदी ही करण्यात येणार आहेत. जिल्हानिहाय तज्ञांनी काम केल्यावर या बारवाचं जतन, संवर्धन आणि उपयोगिता होईल याचं मार्गदर्शन आपण त्यामध्ये घेणार आहोत.
बरोबर, ज्यावेळेला सर्वेक्षणातल्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यावर यापुढे जिल्हा निहाय राज्यभरात यांची उपयोगिता आणि याचं जतन, संवर्धन कसं केलं पाहिजे ते लोकसहभागातून, विद्यार्थी असेल, जिल्हाधिकारी असेल, जिल्ह्यातले तज्ञ असतील त्याचं जनतेमध्ये माहिती जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी पथनाट्य किंवा अन्य कुठला प्रकार असेल या पद्धतीने त्याची कार्यपद्धती सुद्धा स्पष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून येत्या तीन महिन्यांमध्ये यातला प्राथमिक सर्वेक्षणाचा राज्यातल्या सर्व बारवांच्या नोंदीचा स्पष्ट अहवाल येईल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.