शिवाजीनगर मेट्रो स्टेशन वादावर नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबाचे समर्थक म्हटले
मुंबई: कर्नाटक मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्यावरून सुरू झालेल्या वादावर मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी काँग्रेस कुटुंबावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी काँग्रेसला औरंगजेबचे समर्थक असे म्हंटले आहे.
ते म्हणाले, "हे लोक कधीही छत्रपती शिवाजी महाराजांना मानू शकत नाही. ते फक्त त्यांचा अवमान करतील आणि नेहमीच द्वेषाची भावना बाळगत राहतील. काँग्रेसकडून तुम्ही काय अपेक्षा करू शकता? आमच्यासारखे लोकं या मानसिकतेला तीव्र विरोध करतील." शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंटमेरी ठेवण्याच्या वादावरून नितेश राणे यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दि. ८ सप्टेंबर रोजी सेंट मेरीज बॅसिलिका येथे सिद्धरामय्या यांनी आश्वासन दिले होते की, शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी यांच्या नावावर ठेवले जाईल. शिवाजीनगरचे आमदार रिझवान अर्शद आणि बंगळुरूचे आर्च बिशप पीटर मचाडो यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर म्हणून त्यांनी हे विधान केले.
उद्धव ठाकरेंवर टिका
दुसरीकडे, भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्याबाबत उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "सामना आणि उद्धव ठाकरे यांना भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? उद्धव ठाकरे जेव्हा मुंबई आणि महाराष्ट्रातून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले तेव्हा त्यांच्या विजयी रॅलीत 'पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावण्यात आले, हिरवे झेंडे फडकवण्यात आले आणि हिरवा गुलाल उधळण्यात आला. त्यावेळी त्यांना पाकिस्तानबद्दल कोणताही राग नव्हता, पण आता अचानक कसे काय त्यांचे भारतावरील प्रेम उफाळून आले?"
आदित्य ठाकरेना टोला
राणे यांनी आरोप केला की राजकीय फायद्यासाठी राष्ट्रवादाचा मुखवटा घातला जात आहे, परंतु भूतकाळातील कृत्ये आणि विधानेच त्यांचा खरा चेहरा उघड करतात. यादरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे बुरखा घालून भारत-पाकिस्तान सामना गुपचुप पाहिल, आणि त्यांच्या आवाजामुळे त्यांना ओळखले देखील जाणार नाही.