आता बँकेसारख्या सुविधा लवकरच!
मुंबई : देशातील कोट्यवधी ईपीएफओ सदस्यांसाठी आनंदवार्ता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सदस्यांना पीएफचा पैसा आणि पेन्शन एटीएमच्या माध्यमातून काढता येते. इतकेच काय सदस्यांना युपीआय प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही रक्कम काढता येईल अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. अर्थात सरकार दरबारी याविषयी मोठे मंथन सुरू आहे. तर ईपीएफओ ३.० कधी सुरू होईल याची सदस्यांना प्रतिक्षा आहे. जून-जुलै महिन्यात ही सुविधा सुरू करण्याची चर्चा सुरू होती. पण सेवा सुरू झाली नाही. पण आता या बैठकीत यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) देशभरात लाखो सदस्य आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची (सीबीटी) महत्त्वपूर्ण बैठक १०-११ ऑक्टोबर रोजी होत आहे. पुढील महिन्यातील या बैठकीतून महत्त्वपूर्ण अपडेट समोर येण्याची दाट शक्यता आहे. ईपीएफओ ३.० ची अंमलबजावणी कधी करायची याविषयीची घोषणा या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. सदस्यांना बँकेसारख्या पीएफ सुविधा मिळतील. त्यांना एटीएम मिळेल. त्यांचे पीएफ खाते थेट बँकेशी जोडण्यात येईल. तर युपीआयचा वापर करूनही ते पीएफ खात्यातील रक्कम काढू शकतील अशी चर्चा आहे.
रक्कम काढण्यासाठी पूर्वपरवानगीची नाही गरज
ईपीएफओ ३.० हे एक अद्ययावत सॉफ्टवेअर आहे. ते ईपीएफओ सदस्यांना बँकेसारख्या सोयी-सुविधा पुरवेल. या नवीन सुविधेमुळे सदस्यांना एक ठराविक रक्कम त्यांच्या खात्यातून काढता येईल. एटीएमच्या माध्यमातून एक निश्चित रक्कम काढता येईल. त्यासाठी पूर्व परवानगीची आणि अर्ज करण्याची गरज नसेल. जून-जुलैपासूनच ही सुविधा देण्यात येणार होती. पण सॉफ्टवेअरमध्ये अचानक तांत्रिक अडचण आल्याने ही सुविधा लांबणीवर पडली. ऑक्टोबरमधील बैठकीत त्याबाबतची घोषणा होऊ शकते.
सध्या किमान १००० रुपये मासिक पेन्शन देण्यात येते. ही रक्कम वाढविण्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची किती दिवसांची मागणी आहे. येत्या बैठकीत त्यावर निर्णय होईल का, याकडे ही पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी ही रक्कम १५०० ते २५०० रुपये वाढविण्याची विनंती सरकारकडे केली आहे. महागाई वाढली असल्याने किमान निवृत्ती वेतनाची रक्कम वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.