
जम्मू काश्मीर: माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. गेल्या १७ दिवसांपासून स्थगित केलेली यात्रा पुन्हा सुरू होऊ शकते अशी माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे नवरात्रीच्या आधीच माता वैष्णो देवीचे दरवाजे पुन्हा उघडले जाणार असल्याची शक्यता आहे
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि अर्धकुवारीजवळ झालेल्या भूस्खलनामुळे गेल्या १७ दिवसांपासून माता वैष्णो देवीची यात्रा थांबवण्यात आली आहे. पण आता हवामान स्वच्छ झाल्यानंतर माता वैष्णो देवीची यात्रा पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्राइन बोर्डाकडून अधिकृत घोषणा
मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच माता वैष्णो देवीचा दरबार भाविकांच्या दर्शनासाठी उघडणार आहे. अलीकडेच भूस्खलन, मुसळधार पाऊस आणि ट्रॅकची आवश्यक देखभाल यामुळे माता वैष्णो देवी मंदिराची यात्रा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हवामान स्वच्छ होऊ लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर, श्राइन बोर्डाने यात्रा पुन्हा सुरू करण्याची आणि भाविकांसाठी दरबार उघडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचबरोबर, भाविकांना माता वैष्णोदेवी यात्रेसाठी सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
यात्रा अंदाजे कधीपासून सुरू होणार?
श्राइन बोर्डाने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, स्थगित झालेली माता वैष्णोदेवी यात्रा दि. १४ सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होऊ शकते. श्राइन बोर्डाच्या मते, जर हवामानासह सर्व काही ठीक असेल तर १४ सप्टेंबरपासून भाविकांसाठी यात्रा सुरू केली जाईल. दि. २६ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३४ भाविकांचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. परिस्थिती बिकट झाल्यानंतर, प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ यात्रा पुढे ढकलली होती. आता श्राइन बोर्डाने १४ सप्टेंबरपासून भाविकांसाठी यात्रा पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
श्राइन बोर्डाने भाविकांना केले आवाहन
श्राइन बोर्डाने वैष्णोदेवी यात्रा पुन्हा सुरू होण्यास हिरवा कंदील जरी दिला असला तरी यात्रेकरूंना काही निर्देश देण्यात आले आहेत. यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांना त्यांचे वैध ओळखपत्र सोबत ठेवण्याचे आणि यात्रेसाठी ठरवलेल्या मार्गांचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. श्राइन बोर्डाने असेही निर्देश दिले आहेत की यात्रेकरूंनी ग्राउंड स्टाफला पूर्ण सहकार्य करावे जेणेकरून प्रवास आनंददायी आणि सुरक्षित राहील. ज्या भाविकांना लाईव्ह अपडेट्स, बुकिंग सेवा किंवा हेल्पलाइन सपोर्टची आवश्यकता आहे ते श्राइन बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट www.maavaishnodevi.org ला भेट देऊ शकतात. या अधिकृत वेबसाइटवर यात्रेशी संबंधित प्रत्येक माहिती भाविकांना दिली जाईल.