शिर्डीत बाल हक्कांची पायमल्ली? पोलिसांचा कठोर इशारा!

अल्पवयीन मुलांकडून भिक्षा व विक्री करविणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल


शिर्डी : जगप्रसिद्ध साईबाबांच्या शिर्डीत रोज लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. मंदिर परिसरातील या भाविकांच्या लोंढ्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक प्रकारचे व्यवसाय फुलतात.


मात्र या संधीचा गैरफायदा घेत काही पालक आपल्या अल्पवयीन मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी भिक्षा मागणे, प्रसाद-फुले विक्री किंवा गंध लावण्यासारख्या कामांसाठी रस्त्यावर उभे करतात. मुलांचे बालपण हिरावून घेणारी ही धक्कादायक वास्तवता उघडकीस आल्यानंतर अखेर शिर्डी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.


दरम्यान ११ सप्टेंबर रोजी राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल १२ बालके (१० मुले व २ मुली) मंदिर परिसरात जबरदस्तीने भिक्षा व विक्रीस भाग पाडली जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पालकांकडूनच आपल्या लेकरांना क्रूर वागणूक देत रस्त्यावर उभे करण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८३/२०२५ नोंद करण्यात आला. हा गुन्हा बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारीत २०२१ अंतर्गत कलम ७५ व ७६ नुसार दाखल करण्यात आला आहे.


सदर बालकांना तातडीने बाल कल्याण समिती, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर व संगमनेर येथील बाल निरीक्षण गृहे येथे दाखल करण्यात आले असून त्यांचे पुनर्वसन व संरक्षणाची प्रक्रिया सुरू आहे.


सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे तसेच उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे, कर्मचारी निवांत जाधव, सागर काळे, संदीप उदावंत, पंकज गोसावी, केवलसिंग राजपुत, किरण माळी, गजानन गायकवाड, विजय धनेधर, सोमेश गरदास, घोनशेटवाड तसेच महिला व बाल विकास विभागातील अधिकारी योगीराज अशोक जाधव, गिरीधर चौरे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढे अशा प्रकारे अल्पवयीन मुलांकडून भिक्षा मागवून घेणे अथवा विक्री करविणे आढळल्यास पालकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.


शिर्डी हे केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर ते समाजाला दिशा देणारे स्थान आहे. अशा पवित्र भूमीतच लहानग्यांचे बालपण रस्त्यावर उभे करून नासवले जात असेल, तर ही बाब संपूर्ण समाजासाठी लज्जास्पद ठरते. मुलांच्या शिक्षणाऐवजी हातात प्रसादाची टोपली देणारे पालक प्रत्यक्षात त्यांच्या भविष्यावर गदा आणत आहेत. शिर्डी पोलिसांनी घेतलेले पाऊल ही केवळ कारवाई नसून, संपूर्ण समाजाला दिलेला धडा आहे की मुलांचे बालपण आणि शिक्षण हिरावणाऱ्यांविरुद्ध कायदा आता रस्त्यावर उतरणार आहे.


जिथे बाबांनी चिमुरडीसाठी पाण्यावर दिवे पेटविले… त्याच शिर्डीत आज लहानग्यांचे बालपण विझवले जातेय !


शिर्डीच्या इतिहासात असा एक प्रसंग आजही भक्तांच्या स्मरणात आहे. द्वारकामाईतील दिव्यांसाठी तेल न मिळाल्याने एका चिमुरडीचे डोळे पाणावले आणि साईनाथांनी तिच्या आसवांचे मोल देत पाण्यावर दिवे पेटवून दाखविले. हा प्रसंग म्हणजे बाबांच्या निरागस बालकांवरील अपार प्रेमाचे मूर्तीमंत उदाहरण. पण आजच्या शिर्डीत वास्तव अगदी उलट दिसते. मुलांच्या हातात पुस्तकाऐवजी प्रसादाची टोपली, हार-फुलांचे गाठोडे, गंधाचा डबा देऊन पालक त्यांच्याकडून पैसे कमावण्याचा निर्लज्ज गोरखधंदा सुरू करत आहेत. मुलांच्या निरागस हास्याऐवजी त्यांच्या चेहऱ्यावर रस्त्यावर उभे राहण्याची लाचारी त्यांच्या भविष्याऐवजी तात्पुरता पैसा महत्त्वाचा ठरतोय. हे चित्र बाबांच्या करुणामयी स्मृतींना तडा देणारे आहे. साईनाथांनी ज्यांना आपल्या कुशीत घेऊन मायेचा साक्षात्कार करून दिला त्याच शिर्डीत आज बालपणाची लुट होत आहे हे दृश्य प्रत्येक साईभक्ताला चटका लावणारे आहे.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी