मुंबई : अज्ञात व्यक्तीने स्वतःची ओळख लपवून तयार केलेल्या ई मेल अकाउंटद्वारे मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली आहे. ही धमकी मेलद्वारे पाठवण्यात आली आहे. धमकी मिळताच दोन्ही उच्च न्यायालयांमध्ये कामकाज स्थगित करुन परिसर रिकामा करण्यात आला आहे. धमकीच्या ई मेलची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाडच्या मदतीने मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयात तपास सुरू केला आहे. अद्याप दोन्ही उच्च न्यायालयांमध्ये बॉम्ब किंवा बॉम्बसदृश वस्तू आढळलेली नाही.
मुंबई आणि दिल्ली उच्च न्यायालयाला बॉम्बची धमकी नेमकी कोणी दिली याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सायबरतज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. धमकी देऊन दहशत पसरवणे, न्यायालयीन कामकाजात अडथळे निर्माण करणे या प्रकरणांमध्ये धमकी देणाऱ्यावर अटक करुन कठोर कारवाई करणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.