काठमांडू : नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर घातलेली अचानक बंदी मोठ्या उद्रेकाला कारणीभूत ठरली आहे. या निर्णयाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून राजधानी काठमांडूसह इतर प्रमुख शहरांमध्ये हिंसाचार पेटला आहे. आंदोलकांनी न्यायपालिका, संसद भवन, तसेच प्रधानमंत्री निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणावर जाळपोळ केली. फक्त सरकारी इमारतीच नव्हे, तर थेट मंत्र्यांची घरे आंदोलकांच्या निशाण्यावर आली. काही मंत्र्यांना घराबाहेर खेचून त्यांच्या निवासस्थानांना आग लावल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यामध्ये मंत्र्यांना बेदम मारहाणही करण्यात आल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. भारतासह इतर देशांतील शेकडो पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असून, काठमांडू विमानतळावर लष्कराने तातडीने ताबा घेतला आहे. नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन अधिकृतरीत्या करण्यात आले असले तरी परिस्थिती पूर्णपणे चिघळलेली दिसत आहे. दरम्यान, वाढत्या हिंसाचारामुळे काही मंत्र्यांनी राजीनामे सादर केले असून, सरकारवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. नेपाळमधील ही परिस्थिती शेजारील देशांनाही चिंतेत टाकणारी ठरत आहे.
भारतात उच्चस्तरीय बैठक, सीमावर्ती भागात सुरक्षा वाढवली
नेपाळमध्ये सुरु असलेल्या राजकीय अस्थिरता आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारताने देखील मोठी खबरदारी घेतली आहे. काठमांडूत नागरिकांचा संताप उफाळून आल्यानंतर आणि आंदोलकांनी सरकारी इमारतींवर हल्ले केल्यानंतर, भारत सरकारने तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत नेपाळ-भारत सीमावर्ती भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. संभाव्य धोके लक्षात घेता सीमावर्ती भागात सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे. काही संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलीस आणि पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नेपाळमधील चिघळलेल्या परिस्थितीमुळे सध्या शेकडो भारतीय पर्यटक अडकले आहेत. त्यांना सुरक्षितरित्या भारतात परत आणण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असून, परराष्ट्र मंत्रालय स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. भारताकडून नागरिकांना नेपाळमध्ये जाण्याचे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे. तणावग्रस्त परिस्थिती पाहता भारत सरकार पूर्ण दक्षतेने पावले उचलत आहे.
नेपाळमध्ये कैद्यांचा तुरुंगातून पळ काढण्याचा प्रयत्न
नेपाळमध्ये वाढलेल्या अशांततेदरम्यान रामेछाप जिल्ह्यातील तुरुंगातून कैद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नाला थोपवण्यासाठी लष्कराला गोळीबार करावा लागला. लष्कराच्या कारवाईत दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून दहा कैदी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, देशातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेत अनेक कैद्यांनी तुरुंगाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षादलांनी कठोर पावले उचलली. यावेळी लष्कराने केलेल्या गोळीबारामुळे तुरुंगाबाहेरील तणाव आणखी वाढला आहे. सध्या तुरुंग परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून प्रशासनाने आणखी बळ मागवले आहे. मोठ्या संख्येने कैदी पळून जाण्याचा धोका कायम असल्याने स्थानिक प्रशासन सज्ज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नेपाळमध्ये सुरु असलेल्या आंदोलन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील या प्रकारामुळे प्रशासनाचा तणाव अधिक वाढला आहे.
अहमदाबाद : अहमदाबादहून लंडनकडे रवाना झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा झालेला भीषण अपघात अजूनही ताजा असतानाच, एअर इंडियाच्या विमानांमधील सातत्याने ...
नेपाळमधील हिंसाचारावर भारताची करडी नजर
नेपाळमधील वाढत्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काठमांडू तुरुंगातून पळून गेलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला भारतीय सुरक्षा दलाने (SSB) ताब्यात घेतले आहे. सोन्याच्या तस्करीच्या गंभीर आरोपाखाली या व्यक्तीला नेपाळमध्ये पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. परंतु सुरू असलेल्या गोंधळाचा फायदा घेत त्याने तुरुंगातून पलायन केले. सीमेवर सतर्क असलेल्या एसएसबी जवानांनी कारवाई करत या आरोपीला पकडले. त्यामुळे पळून गेलेल्या इतर कैद्यांच्या हालचालींवर देखील सुरक्षा दलांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावर भारत सरकारने करडी नजर ठेवली असून सीमेवरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा हिंसाचार चीनच्या हस्तक्षेपामुळे भडकला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या घडामोडींचा परिणाम पर्यटनावरही झाला आहे. मुंबई आणि पुण्यातील शेकडो पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एवढेच नव्हे तर, परिस्थिती धोकादायक होत चालल्याने अनेक विमान कंपन्यांनी नेपाळकडे जाणारी आपली उड्डाणे तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.