मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘शिवसंस्कार चित्रकाव्य कलादालन’ या आगळ्या-वेगळ्या सांस्कृतिक उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते संपन्न झाले.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा दुर्गांचा ऐतिहासिक समावेश झाल्यामुळे महाराष्ट्र संस्कृतीकडे जागतिक स्तरावर सर्वदूर अभिमानाने आणि औत्सुक्याने पाहिले जात आहे. रायगड, विजयदुर्ग, साल्हेर, शिवनेरी, लोहगड, जिंजी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, खांदेरी, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग हे बारा दुर्ग ‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स’ या संकल्पनेअंतर्गत युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.
या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील कालातीत मूल्ये भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, दि. ८ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान विविध उपक्रमांसह मुंबईतील प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई यांनी "शिवसंस्कार महोत्सव २०२५" आयोजित केला होता. हा महोत्सव इतिहास, संस्कृती आणि प्रेरणेचा एक सुंदर संगम ठरला.
शिवसंस्कार महोत्सव केवळ इतिहासाचे सादरीकरण म्हणून नव्हे, तर आजच्या नागरिकांसाठी, तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती, नेतृत्व, नीतिमत्ता, चारित्र्य आणि एकता या मूल्यांची आठवण करून देणारा एक जिवंत अनुभव असेल. सईशा प्रॉडक्शन्स, मुंबई गेली १५ वर्ष हा अनमोल वारसा जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य करीत आहे.