काठमांडू : नेपाळमधील परिस्थिती आता अत्यंत गंभीर बनली आहे. आंदोलनकर्त्यांचा रोष कमी होण्याचं नाव घेत नाही.अशातच आता नेपाळमधील १८ जिल्ह्यांतील कारागृहांमधून सुमारे ६,००० कैदी पळून गेले आहेत. दरम्यान नेपाळच्या तुरुंगातून फरार झालेले ५ कैदी भारत-नेपाळ सीमेद्वारे भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि त्यांना अटक करण्यात आली.
सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ने या ५ कैद्यांना भारतात घुसण्याचा प्रयत्न करताना पकडले. ही घटना सिद्धार्थनगर परिसरातील भारत-नेपाळ सीमेजवळ घडली. त्यानंतर या सर्व कैद्यांना पोलिसांच्या हवाली करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. अटक केलेल्या या कैद्यांनी सांगितले की, “नेपाळमधील परिस्थिती अत्यंत भीषण आहे, तिथे लोकांना ठार मारले जात आहे. आम्ही नेपाळमध्ये परत जाणार नाही, भारतीय तुरुंगात राहायला तयार आहोत.
नेपाळ सरकारने फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअॅप आणि एक्स यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घातल्यामुळेच ही आंदोलने सुरू झाली. या आंदोलनांमध्ये मोठ्या प्रमाणावर जेन-झेड (तरुण पिढी) सहभागी झाली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांची आणि सुरक्षा दलांशी झडप झाली, ज्यामध्ये २० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला.
काठमांडूसह इतर जिल्ह्यांमध्येही आंदोलनं पसरली आणि त्याने हिंसक वळण घेतले.अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ले करण्यात आले. पंतप्रधान के. पी. ओली यांच्या राजीनाम्यानंतरही संताप कमी झाला नाही. अनेक सरकारी इमारतींना आग लावण्यात आली. सध्या संपूर्ण नेपाळमध्ये परिस्थिती अगदी पेटलेली आहे.
आता सैन्याने देशाची सूत्रं हातात घेतली असून संपूर्ण देशात कर्फ्यू लागू केला आहे. सैन्य आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.