वसई : वसई - विरार महानगरपालिका हद्दीत सध्या धोकादायक बांधकामे,उद्यान, नाल्यावरील स्लॅब कोसळण्याचा घटना सतत घडत आहेत. अशातच बुधवारी धोकादायक झालेल्या स्काय वॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही.
वसई रेल्वे स्थानक व विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत. या स्काय वॉकचा फारसा वापर होत नसून मागील अनेक वर्षांपासून केवळ जागा अडविण्याचे काम हे स्काय वॉक करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या स्काय वॉकचे काही महिन्यांआधी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. मात्र सध्या हा स्काय वॉक धोकादायक बनला असून बुधवारी अचानक वर्तक महाविद्यालयाच्या मुख्य द्वारा समोरच असलेल्या स्कायवॉक खालच्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या. या वेळी कोणीही नागरिक स्काय वॉक खाली उभे नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून लोंबकळत असलेल्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शिट काढल्या आहेत. या धोकादायक स्काय वॉकची दुरुस्ती करावी अन्यथा तो काढून टाकावा अशी मागणी भाजपच्या महेश सरवणकर यांनी केली आहे.