काल, मंगळवारी रात्री वरळी डोम येथे पक्षाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पक्षाच्या आगामी रणनीती, संघटनात्मक बदल आणि स्थानिक निवडणुकांची तयारी यावर या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. पण इतक्या महत्वाच्या बैठकीत अजित पवार यांची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली. त्यानंतर आजही अजितदादांचे सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. अजित पवार आजारी असल्यामुळे बाहेरच्या कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांकडे या प्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली होती. या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे सरकारमध्ये अजितदादा एकटे पडले आहेत का? की अजून काही राजकीय कारण आहे? अशा अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.