काही दिवसांपूर्वी मुंबई नगरीचे एक वेगळेच रूप बघायला मिळाले. गेल्या आठवड्यात गाजला तो मराठा आरक्षणाचा भगवा झंजावात. या मराठा आरक्षण विषयाने राजकारणच नव्हे, तर सर्व समाजमन ढवळून गेले होते. जरांगे-पाटलांना मुंबईत एंट्री काय मिळाली आणि ते पाच दिवस जे काय गाजले त्यांनी मुंबईतल्या गणपती उत्सवाच्या बातम्या मागे पडल्या. या दिवसांत विविध वृत्तवाहिन्यांवर अखंडपणे गणपती दर्शन सुरू असते, त्या दिवसांत मराठा आंदोलनामुळे टीव्हीवाल्यांचा टीआरपी चांगलाच वाढला. या वाहिन्यांनी आझाद मैदानात जरांगे-पाटील यांच्या व्यासपीठावरील थेट प्रक्षेपणापासून अगदी थेट आसपासच्या परिसरातील थेट प्रक्षेपण दाखवून आझाद मैदानातील एका आंदोलनाचे महत्त्व राज्यातील खेड्यापाड्यात पोहोचवले. यात त्यांनी आपला टीआरपीही चांगलाच वाढवला. कारण या गोष्टीच खूप मजेशीर व गमतीशीर होत्या.
मुंबईत आल्यानंतर जरांगे-पाटील यांनी आरक्षण हा विषय खूपच गांभीर्याने घेतला व त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरू होती. मात्र त्यांच्या बाहेरील समर्थकांचे काय? खरंच मराठे बांधव हे समाजाच्या चेष्टेचा विषय बनले का? जरांगे-पाटील यांनी केलेल्या उपोषणाने त्यांच्या पदरी काय पडले, या मतमतांतराच्या गोष्टी ठरतील, मात्र आपण ज्यांच्यासाठी या आंदोलनात सहभागी झालो आहोत, त्यांच्या मानसिकतेचे काय? जरांगे समर्थकांच्या या गोष्टी निरनिराळ्या चष्म्यातून बघता येतील. जरांगेंचे समर्थक एका ठिकाणी येतात काय आणि आपले शक्तिप्रदर्शन दाखवतात काय, जरांगे यांचे उपोषण अनिश्चित काळासाठी होते. आंदोलकांची संख्या लाखोंची होती, मग नुसत्या आंदोलनात किती काळ अडकणार? कोणी माणूस कितीही क्लिष्ट असला तरी त्यालाही क्षणभर विरंगुळा हा हवाच असतो. मग काय काय नाही केलं या आंदोलकांनी. सर्व काही केले. फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी सर्व खेळांचे प्रदर्शन रस्त्यारस्त्यांवर दिसून आले. त्यानिमित्त काही ग्रामीण भागातील खेळही यानिमित्ताने मुंबईकरांना पाहता आले. विजेच्या खांबावर चढणे, बसच्या टपावर चढणे, रस्त्यावर मिळेल त्या वस्तूवर चढून गाडी गाडी खेळणे असे आपल्या बालपणात जणू काही सर्वजण जगत होते. सर्वत्र खाण्यापिण्याची चंगळ होती. अगदी पाण्यापासून चिवडा, फळे, जेवण याला तर काहीच ददात नव्हती. त्यामुळे खाऊन-पिऊन प्रत्येकाच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता. मग एका जागेवर तरी किती टिकणार, तो माणूस शेवटी, मग झाले मुंबई पर्यटन सुरू. मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, हँगिंग गार्डन अशी भटकंती सुरू झाली. मुंबईत सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू असून सर्वत्र गणपतीच्या मंडपात मराठे समर्थकच दिसू लागले. या आंदोलकांपैकी कितीतरी जणांनी आतापर्यंत समुद्र बघितला नव्हता. समुद्राचे ते विशाल रूप पाहून कितीतरी जण हरपून गेले. कित्येक जणांनी मुंबईच्या त्या रेल्वेच्या लोकलमधूनही प्रवास केला नव्हता.
कित्येक जणांनी ती गर्दी अनुभवली नव्हती. कितीतरी जण आपल्या गावाला राहून मुंबईसारख्या शहरांना नावे ठेवून 'गड्या आपला गावच बरा', असे म्हणून आपण कधी शहरात जाणार नाही असे म्हणून हुशारक्या मारत होते. आतापर्यंत चित्रपटात पाहिलेले मुंबई नगरीचे रूप पाहून मुंबईची ती भव्यता, विशालता, उंच इमारती पाहून थबकून गेले होते. रस्त्यावरील रहदारी, न थांबणारी माणसे, २४ तास कार्यरत असणारी मुंबई पाहून आपणही मुंबईचा एक भाग होऊन शहरात स्थलांतर करूया अशी विचार करणारी काही मंडळी होती. या दिवसांत समाज माध्यमात हिंदी चित्रपट स्वर्गमधील एक गाणे खूपच लोकप्रिय झाले होते 'बम बम बम बम बम्बई,' बम्बई हम को जम गयी' असे ते गाणे होते. यात कित्येक जणांना ही मुंबईची दमछाक करणारी वृत्ती मानवेल हा संशोधनाचा विषय ठरू शकेल. या आंदोलनात मोर्चाच्या बाहेरील व्यक्तींनी घुसखोरी करत या आंदोलनाला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. समाज माध्यमांमध्ये या आंदोलनाबाबतीत खूप नकारात्मक बाबी येत होत्या, मात्र एक लक्षात घेतले पाहिजे, की हे आंदोलन शांततापूर्ण आंदोलन होते. छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकात मराठी आंदोलन पाऊस असल्यामुळे तळ ठोकून होते. रोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांचे जथ्थेच्या जथ्थे उतरतात. या आंदोलकांचा त्रास सामान्य प्रवाशांना झाला असेल, मात्र त्या प्रवाशांच्या नजरेत एक कुतूहल मिश्रित आदर होता. कारण या परिसरात आंदोलन होतात, मात्र एवढे मोठे अशा प्रकारचे आंदोलन त्यांनी पहिल्यांदाच पाहिले. त्यामुळे जरी त्यांच्या डोळ्यांत कुतूहल असले तरी भीती निश्चितच नव्हती. कारण काही वर्षांपूर्वी एका विशिष्ट समाजाकडून एक आंदोलन करण्यात आले होते ते चिघळले. त्यानंतर जे काही घडले त्यात अगदी महिला पोलिसांनाही त्यावेळी सोडण्यात आले नाही असो. या आंदोलकांनी पाच दिवसांत जाता जाता मुंबईकरांचे आभार मानले. पण मुंबईकरांकडून त्यांना आलेला कडवटपणा त्यांच्या जास्त लक्षात राहिला. मुंबईकरांच्या वागण्यातील रुक्षपणा, कोरडेपणा, त्यांना गावच्या भाबड्या मनाला पटला नाही.आंदोलनकर्त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावागावातून बाटलीबंद पिण्याचे पाणी पाठवण्यात आले ते घेण्यासाठी मोठी झुंबडही उडत होती. मात्र काही घटकांकडून हेच पाणी घेऊन मरिन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीसारख्या ठिकाणी दहा रुपयांत विक्रीसाठी नेले होते. याच्या गावकरी आंदोलकांना आश्चर्यच वाटले. असे-कसे मुंबईकर अशी एक भावना त्यांच्या चेहऱ्यावर होती. मुंबईसारख्या मोठ्या शहरात पहिल्यांदा आलेले मराठा तरुण सुरुवातीला गोंधळलेले, अस्वस्थ होते. त्यात वरून येणाऱ्या पावसाच्या सरी, अपुरी सोय आणि वाढती अस्वस्थता यामुळे कित्येकांचा शारीरिक थकवा वाढत होता. कित्येक आजारी पडले तर एकाचा मृत्यू झाला. या मराठा आंदोलनामुळे कित्येकांचा रोजगार बुडाला. मुंबई शहरातील मोठ्या मंडया बंद राहिला. त्यांच्यामुळे हातगाड्या थांबल्या. मुंबईची जशी कोंडी झाली तशी वाहतूक कोंडीही झाली.
प्रत्येक राजकीय पक्षाने आंदोलन करणाऱ्यांसाठी तसेच श्रमिकांची यावेळी खाण्यापिण्याची सोय केली. चिवडा, लाडू, दूध, बिस्किटे, फळे, पाणी. एवढे मुंबईत आले, की अन्नपदार्थ आंदोलकांबरोबरच सामान्य नोकरदार मुंबईकरदेखील मराठा बांधवांच्या शिदोरीत जेवू लागले. आपल्याकडील फरसाण, केळी, पेरू भरभरून देताना आंदोलक मुंबईकरांनी पाहिला तर गावावरून आलेल्या दुधाचा चहा बनवून आंदोलकही मुंबईकरांना प्रेमाने देऊन एका वेगळ्या माणुसकीचे दर्शन घडवत होते. आझाद मैदानाने आतापर्यंत बरीच आंदोलने बघितले. आजही त्या आंदोलनात गरीब, आदिवासी ते सरकारी निमससरकारी कर्मचारी, खासगी सेवेतील कर्मचारी इतकेच काय तर डॉक्टर यांचे नित्यनेमाने आंदोलने सुरूच असतात. मात्र आंदोलनाचे आजचे हे रूप पाहून काही लोकांनी तर आता आझाद मैदानात आंदोलनेच नको अशा प्रकारची विचित्र मागणी केली आहे. त्रास एका घटकाला झाला असेल, मात्र न्यायापासून वंचित असणाऱ्याला अशा प्रकारे आंदोलनालाच नकार देणे हे म्हणजे एक प्रकारे न्याय मागणाऱ्यावर अन्याय ठरेल.आणखी दुसरी गोष्ट ही लक्षात घेतली पाहिजे, की न्याय मागणारे हे मराठी असतात. विशेषतः महाराष्ट्र राज्यातील असतात. कोणेएकेकाळी हेच मोर्चे सचिवालयापर्यंत धडकत असत. मात्र न्यायालयाने तेथे त्यांना मज्जाव करून आझाद मैदानापर्यंतच या मोर्चांना कायद्याच्या कचाट्यात आणले. बाकी मराठ्यांचे आंदोलन झाले ते महाराष्ट्रातील लोकांचे होते. ते त्यांच्या राजधानी मुंबईत न्याय मागणार नाही तर कुठे मागणार. भले त्यांचा मार्ग थोडा वेगळा व इतरांच्या नजरेत भरणारा असेल मात्र मोर्चेच नको हे सांगणे म्हणजे एखाद्याला न्याय नाकारणेच ठरेल, हे या लोकशाहीत कोणालाच पटणारे नसेल. कदाचित उद्या आझाद मैदानावर जाण्याची गरज पडेल भविष्याचे काहीच सांगता येत नाही. - अल्पेश म्हात्रे







