Tuesday, September 9, 2025

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : लालबागचा राजा मंडळाची पहिली मोठी अ‍ॅक्शन; कोळी बांधवाला थेट कोर्टात खेचणार, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : दरवर्षीप्रमाणे या वर्षीही लालबागचा राजा गणेशोत्सव संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आला. मात्र, यंदा समुद्राला मोठी भरती आल्यामुळे विसर्जन सोहळ्यात उशीर झाला. या विलंबानंतर गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी मंडळावर चुकीचे आरोप करत खोटी माहिती पसरवली. या वक्तव्यामुळे मंडळाची प्रतिष्ठा धोक्यात आल्याचा आरोप करून, लालबागचा राजा मंडळाने हिरालाल वाडकर यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळाने ही याचिका थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. विसर्जन हा श्रद्धा आणि परंपरेशी निगडीत सोहळा असल्याने अशा प्रकारचे खोटे दावे आणि अफवा समाजात चुकीचा संदेश देतात, असे मंडळाचे म्हणणे आहे.

"हिरालाल वाडकरांचा लालबाग राजाशी संबंध नाही"

लालबागच्या राजाच्या विसर्जनाबाबत सोशल मीडियावर उठलेल्या अफवांना लालबाग राजा मंडळाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मंडळाने सांगितले की, गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांचा लालबाग राजा मंडळाशी कधीच संबंध नव्हता आणि नाही. त्यांनी कधीच लालबाग राजाचे विसर्जन केलेले नाही. तरीदेखील, सोशल मीडियावर वाडकर यांच्या दाव्याचा आधार घेत चुकीच्या वावड्या पसरवल्या गेल्या. मंडळाच्या म्हणण्यानुसार, हिरालाल वाडकर यांनी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि मंडळाची बदनामी करण्याच्या हेतूने व्हिडिओ प्रसारित केला. त्यामुळे भक्तांमध्ये गोंधळ निर्माण झाला आणि श्रद्धेच्या या सोहळ्यावर अनावश्यक वाद निर्माण झाले. या प्रकरणी मंडळाने पुढे जाऊन कायदेशीर कारवाई करण्याची भूमिकाही स्पष्ट केली आहे.

हिरालाल वाडकर नेमकं काय म्हणाले होते?

हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत आलो आहोत. पण यंदा मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिले आणि त्यामुळेच संपूर्ण गणित चुकले.” त्यांनी पुढे आरोप केला की, भरती-ओहोटीचा अचूक अंदाज न आल्याने विसर्जनात विलंब झाला. वाडकर म्हणाले, “आम्ही अनेक वर्षांपासून विसर्जनाची जबाबदारी पार पाडत होतो. पण गुजरातच्या तराफ्यामुळे यंदा कॉन्ट्रॅक्ट आमच्याकडून काढून घेतले. यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यावी.” या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. लालबाग राजा मंडळाने या आरोपांचे जोरदार खंडन केले असून, हिरालाल वाडकर यांच्याविरोधात कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा