उरण: उरणमधील महत्वपूर्ण आणि अति संवेदनशील ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेचे काही व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरलेले दिसून येत आहे. बातमी समजताच, तात्काळ सीआयएसएफ आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग मोठ्या प्रमाणात लागली असल्याकारणामुळे, आगीचे लोळ पाहून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, ही आग नेमकी कशी लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ही आग तात्काळ विजवणे अत्यंत गरजेचे असल्याचे म्हंटले जात आहे.
याच प्रकल्पाला काही वर्षापूर्वी अशाच प्रकारे भीषण आग लागली होती. दिनांक ३ सप्टेंबर २०१९ रोजी उरण ओएनजीसीला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आजची घटना सहा वर्षापूर्वीच्या त्या घटनेची आठवण करून देत आहे.