
मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यास यंदा उशीर होत आहे. लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले. सकाळी आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला. पण दोन तास गणपती किनाऱ्यावरच होता.
लालबागच्या राजाची मिरवणूक वाजतगाजत आणि गुलाल उधळत गिरगाव चौपाटीवर पोहोचली. चौपाटीवर गणपतीच्या विसर्जनाची तयारी झाली. यानंतर लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवर शेवटची आरती झाली. नंतर लालबागचा राजा समुद्रात नेण्यात आला. पण मूर्ती तराफ्यावर ठेवताना निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणीमुळे विसर्जन रखडले.
विसर्जनासाठी सजवलेला तराफा आणि मूर्ती ठेवलेला पाट यांच्यात समन्वय राखण्यात अडचणी निर्माण झाल्या. यामुळे विसर्जन रखडले. आता दुपारी किंवा संध्याकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोळी बांधवांची मदत घेतली जात आहे. भरतीनंतर ओहोटी येईल. ओहोटी येईपर्यंत थांबावे असा सल्ला कोळी बांधवांनी मंडळाला दिला आहे. समुद्राचे पाणी ओसरल्यानंतरच विसर्जन होऊ शकेल, असे चित्र आहे.