मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. ठिकठिकाणी पोस्टर झळकवण्यात आले. 'देवाभाऊ' नावाने जाहिरात मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेविषयी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची संमती न घेता महायुतीतील भाजपच्या मित्रपक्षातील एका मंत्र्याने 'देवाभाऊ' नावाची जाहिरात मोहीम राबवली, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
पावसामुळे शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी अडीअडचणींमधून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या बिकट परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना विश्वासात न घेता त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या भाजपच्या मित्रपक्षातील एका मंत्र्याने 'देवाभाऊ' नावाची जाहिरात मोहीम राबवल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला.
मित्रपक्षाच्या मंत्र्याने मुख्यमंत्र्यांसाठी निनावी पद्धतीने परस्पर एवढ्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या ? या जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले ? हा मंत्री कोण ? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. जाहिराती देणारी व्यक्ती समोर आल्यास अनेक प्रश्नांची उत्तरं मिळतील, असे आमदार रोहित पवार म्हणाले.
