पुणे : धनगर समाजाबाबत मनोज जरांगे यांनी वापरलेल्या अपशब्दांचा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी तीव्र निषेध केला. धनगर समाजाकडे सुभेदार मल्हार होळकर यांची तलवार, अहिल्यादेवींचा भासळा आणि पिंड, तसेच यशवंतराव होळकर यांच्या तोफा आणि बापू बिरू वाटेगावकर यांची कुऱ्हाड आणि बंदूक आहे. धनगरांना कुठे काय वापरायचे हे चांगलेच कळते, या शब्दात धनगरांसाठी अपशब्दांचा वापर केल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांना धमकावले.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्यास सर्वांचा आक्षेप आहे. सरकारने याबाबत स्पष्टता आणावी, जीआरमधील संभ्रम दूर करावा, जीआर स्पष्ट झाल्यावर आमची भूमिका मांडू. आम्ही कायमच ओबीसींसोबत आहोत आणि राहणार; असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.