वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आपली भूमिका २४ तासांच्या आत बदलल्याचे दिसून आले आहे. आधी चीनमुळे अमेरिका भारत आणि रशियाला गमावत असल्याचे म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी आता थेट मोदींचे कौतुक करत त्यांना ‘महान’ म्हटले आहे, मात्र त्याच वेळी भारताच्या एका धोरणावर त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे.
ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करतानाच, रशियाकडून भारताच्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदीवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका बाजूला दोन्ही देशांचे संबंध विशेष असल्याचे सांगत त्यांनी मोदींना 'उत्कृष्ट आणि महान पंतप्रधान' म्हटले आहे, तर दुसरीकडे भारताच्या धोरणावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
ओव्हल ऑफिसमध्ये बोलताना ट्रम्प यांना भारत आणि अमेरिकेतील टॅरिफवरून निर्माण झालेल्या तणावाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ट्रम्प म्हणाले की, "सध्या मोदी जे करत आहेत, ते मला आवडलेले नाही. भारत मोठ्या प्रमाणावर रशियाकडून तेल खरेदी करत आहे, यामुळे मी खूप निराश आहे." मात्र, या तणावानंतरही त्यांचे आणि मोदी यांचे संबंध चांगले राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याआधीही ट्रम्प यांनी चीनमुळे अमेरिका, भारत आणि रशियाला गमावत आहे, असे म्हटले होते. २४ तासांच्या आत त्यांचे हे बदललेले विधान समोर आले आहे.
याच मुद्द्यावर ट्रम्प यांचे वरिष्ठ सल्लागार पीटर नॅवारो यांनीही भारतावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "भारत रशियाकडून तेल खरेदी करून मोठा नफा कमावत आहे. मला वाटते की ट्रेड टीम आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या गोष्टीने निराश आहेत की, भारत युक्रेनमधील युद्धासाठी रशियाला सतत मदत करत आहे." या सर्व घडामोडींमुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमधील गुंतागुंत वाढत असल्याचे दिसून येत आहे.