
अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध सुरू होत असल्याने रामजन्मभूमी मार्गावरून भाविकांचा प्रवेश बंद केला जाईल आणि मंदिराची दारे बंद ठेवली जातील.
चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारनंतरचे चारही दर्शन स्लॉट्स आणि रात्री होणारी शयन आरती रद्द केल्याचे जाहीर केले. चंद्रग्रहण रात्री सुमारे १० वाजता लागणार असले तरी ग्रहणाचे वेध दुपारी १२.५७ वाजेपासून सुरू होतील.
हे ग्रहण मध्यरात्रीपर्यंत राहणार असल्यामुळे रामललांची शयन आरती देखील होणार नाही. दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळपासून रामलल्लांचे नियमित पूजन व दर्शन पुन्हा सुरू होईल. सकाळी ६.३० वाजेपासून मंदिर दर्शनासाठी खुले राहील.
चंद्रग्रहण व सूर्यग्रहणाच्या वेळी मंदिरांतील देवतांची पूजा व आरती न करण्याची परंपरा आहे. ग्रहणाचा वेध काळ सुरू होताच मंदिर बंद केले जातात, ही परंपरा अयोध्येतील विविध मंदिरांमध्ये शतकानुशतके पाळली जाते.