Sunday, January 18, 2026

उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे यांच्यानंतर कोण होणार होते मुख्यमंत्री ? नितेश राणेंनी केला गौप्यस्फोट

पिंपरी : ‘विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री करणार नव्हते आणि हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी ठाकरे नंतर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते; असा गौप्यस्फोट मंत्री नितेश राणे यांनी केला.

चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चिंचवड ग्रामस्थांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे यावेळी उपस्थित होते.

भाजप अॅनाकोंडा आहे. तो अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला गिळंकृत करेल या उद्धव ठाकरे यांच्या आरोपाबाबत विचारले असता मच्छरानं असं दुसऱ्याला बोलू नये, असे नितेश राणे म्हणाले. शिउबाठा ही काँग्रेसची ढ टीम असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये बेईमानी करून काँग्रेस सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना आयुष्यात कधीच मुख्यमंत्री बनवणार नव्हते, हे शिंदे यांनाही माहिती होते. उद्धव ठाकरे यांच्यानंतर रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे ठरले होते. त्यामुळे भाजपने काय केले हे शिंदे यांना माहिती होते. तब्बल १०५ आमदार असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी त्याग करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. उद्धव ठाकरे यांनी जो मान दिला नाही, तो भाजपने एकनाथ शिंदे यांना दिला’ असे मंत्री नितेश राणे म्हणाले.

कोणत्याही देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण होत असेल लँड जिहादचा प्रयत्न सुरू असेल तर खपवून घेणार नाही. यासाठी आवश्यक ती काळजी प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश मंत्री नितेश राणेंनी दिले.

लोकसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या वातावरणात महाराष्ट्रातल्या हिंदूंनी हिंदुत्ववादी महायुती सरकार निवडून दिल्याचंही मंत्री नितेश राणे म्हणाले.

Comments
Add Comment