मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा जोर पकडला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, शुक्रवारपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस होणार आहे, ज्यामुळे शनिवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
हवामान विभागानुसार, शुक्रवारी सायंकाळपासून ते शनिवार सायंकाळपर्यंत मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर रविवारी पावसाचा जोर कमी होईल. कोकण आणि घाटमाथ्यावरील भागात पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता, मात्र आता हा पट्टा पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी
हवामान विभागाने ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, सातारा आणि कोल्हापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस अपेक्षित आहे, तर विदर्भात केवळ हलक्या सरींचा अंदाज आहे.
धरणे भरली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राज्यातील चांगल्या पावसामुळे अनेक धरणे भरून वाहत आहेत. नाशिक जिल्ह्यातील गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणीपुरवठा आणि सिंचनाचा प्रश्न सुटला आहे, मात्र धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानुसार, सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण वाढेल.