राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मेईतेई समाजात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात शेकडो लोकांचा मृत्यू झाला. मात्र, आता लवकरच हा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १३ सप्टेंबर रोजी मणिपूर राज्याचा दौरा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी सरकारला मोठे यश मिळाले. केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी कुकी-झो कौन्सिल (केझेडसी) सोबत एक नवीन करार केला आहे. ज्याअंतर्गत सर्व पक्षांनी राज्याची प्रादेशिक अखंडता राखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग-२ (NH-2) उघडण्यास सहमती दर्शविली.
गेल्या काही दिवसांत केंद्रीय गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि केझेडसीच्या शिष्टमंडळात अनेक बैठका झाल्या. मणिपूरमध्ये कायमस्वरुपी शांतता आणि स्थिरता आणण्यासाठी संवादाद्वारे तोडगा काढण्याच्या गरजेवरही तिन्ही पक्षांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे लवकरच राज्यातील संघर्ष कायमचा संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इम्फाळ आणि नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांचा असा विश्वास आहे की, आवश्यक वस्तूंची सहज उपलब्धता विस्थापित कुटुंबे आणि मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या अडचणी कमी करेल.
हा निर्णय मणिपूरमध्ये शांतता आणि सामान्य स्थिती परत आणण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मैतेयी आणि कुकी-झो समुदायांमध्ये तणाव सुरू असल्याने हा महामार्ग बंद होता. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अडला नाही, तर सामान्य नागरिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आता कुकी-झो कौन्सिलने केंद्र सरकारसोबत समन्वय करून हा महामार्ग पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून मणिपूरच्या जनतेला दिलासा मिळू शकेल.