नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव जवळील सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे. ज्यात एका कामगाराचा मृत्यू झाला असून १७ कामगार जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे आहे. त्यांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना नागपूरच्या विविध खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकं गाढ झोपेत असताना कंपनीत झालेला हा मोठा स्फोट भयावह होता. ज्यामुळे परिसरात काही काल खळबळ माजली होती. हा स्फोट नेमका कसा झाला? जाणून घेऊ सविस्तर
नागपूर येथील सोलार एक्स्प्लोसिव्ह कंपनीमधील रात्रीच्या सुमारास भीषण स्फोट झाला. तत्पूर्वी सीबी वन या प्लांटमध्ये काही प्रमाणात धूर निघत असल्यामुळे अनुभवी कर्मचाऱ्यांना काहीतरी अगतिक घडेल याचा अंदाज पूर्वीच आला होता. त्यामुळे सर्व कामगारांनी बाहेरच्या दिशेने धाव घेतली. मात्र संबंधित प्लांटमधील मयूर गणवीर हे वेळेत बाहेर पडू शकले नाहीत, आणि तेवढ्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की प्लांटच्या इमारतीचे तुकडे अनेक मीटर लांब पर्यंत उडाले आणि त्या मलब्याच्या आघाताने अनेक कामगार जखमी झाले.
सदर घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिस आणि अग्निशमन दलासह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कूलिंग ऑपरेशन करून मालब्याखाली दबलेल्या जखमींना रात्रीच बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले. सर्व जखमींना प्रथमोपचारानंतर नागपूरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काँक्रीटचे मोठमोठे तुकडे संरक्षण भिंतीला ओलांडून ४०० ते ५०० मीटर अंतरावर पडले
ज्या प्लांटमध्ये स्फोट झाले, त्या प्लांटच्या इमारतीचे काँक्रीटचे मोठमोठे तुकडे कंपनीच्या संरक्षण भिंतीला ओलांडून बाहेर महामार्गावर आणि त्या पलीकडच्या शेतांपर्यंत (जवळपास 400 ते 500 मीटर अंतरापर्यंत) येऊन कोसळले आहेत. यावरून हा स्फोट किती भीषण आहे याचा अंदाज लावता येऊ शकतो.