मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके
आतापर्यंतच्या लेखांमध्ये आपण पातंजल योगातील आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सहा अंगांविषयी माहिती पाहिली. यांमध्ये आसनांपासून समाधीपर्यंतचा, शरीरशुद्धीपासून ते चित्त निर्विचार करण्यापर्यंतचा प्रवास पाहिला. आसनांनी शरीरस्थैर्य, प्राणायाम आणि प्रत्याहारानं मनोनिग्रह व इंद्रियनिग्रह, धारणा आणि ध्यानानं चित्ताची एकाग्रता आणि समाधी अवस्थेत चित्तात उठणाऱ्या सर्व विचारांचा पूर्ण निरोध हे हे पातंजल योगसाधनेचे उत्तरोत्तर प्राप्त होणारे लाभ आहेत. मात्र हे संपूर्ण लाभ प्राप्त होण्यासाठी आणि योगदर्शनाला अपेक्षित असलेल्या कैवल्यपदापर्यंत पोहोचण्यासाठी मन शुद्ध असणं तितकंच आवश्यक आहे. म्हणूनच योगदर्शनात सुरुवातीला पतंजलींनी यम आणि नियम या दोन पायऱ्यांच्याद्वारे नैतिक मूल्यं आत्मसात करायला सांगितली आहेत. पतंजलींनी सांगितलेल्या योगाचं वैशिष्ट्य आहे की त्याची सुरुवात यम आणि नियमरूपानं सांगितलेल्या नैतिक मूल्यांपासून होते. योगसाधना करताना ही सर्व नैतिक मूल्य आत्मसात करणं आवश्यक आहे. या नैतिक मूल्यांशिवाय योग हा खऱ्या अर्थानं जीवाला ईश्वराशी एकरूप करणारा योग न होता केवळ शारीरिक व्यायाम होईल.
यम आणि नियम या पातंजलयोगाच्या दोन अंगांविषयी सविस्तर जाणून घेऊ.
यम : यम शब्द यम् या क्रियापदापासून तयार झाला आहे व त्याचा अर्थ नियंत्रण करणं, आवर घालणं असा आहे. पतंजलींनी सांगितलेल्या पाच यमांद्वारे मनुष्याला आपल्या हातून घडणाऱ्या अनैतिक गोष्टींवर नियंत्रण ठेवता येतं. पुढील पाच यम सांगितले आहेत.
१. अहिंसा : अहिंसा म्हणजे दुसऱ्याला इजा न करणं पीडा न देणं. अहिंसेचे कायिक, वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकार आहेत. कुणालाही शारीरिक पीडा न करणं म्हणजे कायिक अहिंसा, दुसऱ्याला दुःख होईल असं न बोलणं, उपहास न करणं, कठोर न बोलणं, मर्मभेदी भाषण न करणं म्हणजे वाचिक अहिंसा तर मनात हिंसात्मक विचार तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी नकारात्मक भावना निर्माण न होऊ देणं म्हणजे मानसिक अहिंसा होय.
२. सत्य : आपल्या मनातले विचार तसेच ज्ञान दुसऱ्याच्या अंतःकरणात उमटावं म्हणून आपण बोलत असतो. आपल्याला माहित असलेली एखादी गोष्ट जशी आहे तशी, योग्य बोध होईल अशा रीतीनं दुसऱ्याला सांगणं म्हणजे सत्य. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सत्य आणि प्रिय असेल ते बोलावं. पण सत्य अप्रिय असेल तर बोलू नये. प्रिय पण असत्य असेल ते कधीच बोलू नये.
३. अस्तेय : शरीर, वाणी आणि मन यांनी दुसऱ्याच्या धनाविषयी इतकंच नव्हे कोणत्याही वस्तुविषयी अजिबात लालसा न ठेवणं म्हणजे अस्तेय.
४. ब्रह्मचर्य : ब्रह्मचर्य म्हणजे विषयसुखांच्या मागे लागून चित्त अशुद्ध, मलीन होऊ न देणं. मनाला चांगल्या सवयी लाऊन आणि मनाचा संयम करण्याचा सराव करून मन शुद्ध करणं.
५. अपरिग्रह : परिग्रह म्हणजे स्वीकार करणं. त्यामुळेच अपरिग्रह म्हणजे शरीरधारणेसाठी आवश्यक असलेल्या साधनांव्यतिरिक्त वस्तूंचा संग्रह न करणं. अनावश्यक गोष्टींच्या संग्रहानं मनात आसक्ती निर्माण होते आणि मन अशुद्ध होतं.
नियम : हे पातंजलयोगातील दुसरं अंग. नियमातही पाच तत्त्वं सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे -
१. शौच : म्हणजे शुचिता म्हणजे शुद्धी. यामध्ये बाह्य शुद्धता आणि आंतरिक शुद्धता असे दोन भेद आहेत. बाह्यशुद्धी म्हणजे स्नानादी गोष्टींनी शरीर शुद्ध ठेवणं तर आंतरिक शुद्धता म्हणजे मन आणि बुद्धी शुद्ध ठेवणं. आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान इत्यादींनी मन शुद्ध होतं. ही दोन्ही शुद्ध होणं ही ईश्वरी तत्त्वाशी संयोग होण्याची पहिली पायरी आहे.
२. संतोष : संतोष म्हणजे दैवानं आपल्याला जे काही प्राप्त झालं असेल त्यातच समाधान मानणं आणि अधिक साधनांची इच्छा न करणं. तुकारामांच्या शब्दात सांगायचं तर ‘ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान’ अशी वृत्ती.
३. तप : तप म्हणजे एखादी गोष्ट नित्यनियमानं, न चुकता करणं. जसं शास्त्रात सागितलेली व्रतं, अनुष्ठानं, उपवास, सद्ग्रंथांचे वाचन, नियमित साधना यांचा अंतर्भाव तपामध्ये येतो. तपामुळे शरीर आणि मनाला शिस्त लागते.
४. स्वाध्याय : जे ज्ञान प्राप्त केलं आहे त्याची नित्य उजळणी करणं म्हणजे स्वाध्याय. जसं वेदाचा स्वाध्याय किंवा शास्त्राचा अभ्यास. आपल्या इष्टदेवतेच्या मंत्राचा जप दीर्घकाळ खंड न पडू देता करणं याचाही अंतर्भाव स्वाध्यायामध्ये होतो.
५. ईश्वरप्रणिधान : आपल्या शरीरानं, मनानं आणि बुद्धीनं होणारे सर्व व्यवहार ईश्वरार्पण बुद्धीनं करणं आणि या कुठल्याही व्यवहाराच्या फळाची अपेक्षा न करणं म्हणजे ईश्वरप्रणिधान. ईश्वरप्रणिधानानं चित्तशुद्धी होते व हातून घडणारे प्रत्येक कर्म अत्यंत शुद्ध होतं.
यम व नियम या पातंजलयोगाच्या सुरुवातीच्या दोन अंगांचा विचार केला तर असं दिसतं की समाजात वावरताना काय करू नये याचा वस्तुपाठ पतंजलींनी पाच यमांच्याद्वारे आपल्यापुढे ठेवला आहे तर वैयक्तिक जीवनात साधनेतील अडथळे दूर होऊन अंतरंगसाधना उत्तम घडावी यासाठी पाच नियम सांगितले आहेत.
पाच यमांचं पालन करण्याला ‘महाव्रत’ असं म्हटलं आहे. तर नियमांपैकी तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान या तीन नियमांना मिळून ‘क्रियायोग’ असं म्हटलं आहे. यमनियमरूपी ही नैतिक मूल्य शाश्वत आहेत. म्हणूनच या नैतिक मूल्यांचा अवलंब मनुष्यानं केला तर समग्र योगसाधनेचं फळच त्याला प्राप्त होऊ शकतं. आजच्या जीवनातदेखील ही मूल्यं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि प्रत्येकानं अंगी बाणवावी अशीच आहेत. आपल्या नित्य जीवनात यांचा पूर्णतः अवलंब करता आला नाही तरी हळूहळू विचारपूर्वक ही मूल्यं अंगी बाणवली तर निश्चितच नैतिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या आपलं व्यक्तिमत्त्व विकसित होईल हे निश्चित.