मुंबई: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांचे गेल्या पाच दिवसांपासून मुंबईत आमरण उपोषणाला बसले आहे. दरम्यान या दिवसातील आंदोलकांची वाढणारी हुल्लडबाजी आणि स्वैराचार पाहता, आंदोलन गुंडाळण्याच्या पवित्रा प्रशासन तसेच न्यायालयाने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांपाठोपाठ उच्च न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना मुंबई तसेच आझाद मैदान रिकामे करण्यास सांगितले होते. तुमच्याकडे आंदोलनाची परवानगी नसेल तर तात्काळ जागा खाली करा नाहीतर ३ वाजता उच्च न्यायलय या संदर्भात आदेश काढेल असे हायकोर्टाने जाहीर केले. तर दुसरीकडे उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपसमिती बैठकीत आरक्षणाबाबत अंतिम मसुदा तयार केला असून हा मसुदा आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांच्याकडे सोपवला. त्यामुळे मराठा बांधवांचं आंदोलन पुढे कायम राहणार की आजच अंतिम निर्णय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपसमितीची सोमवारी सकाळी बैठक पार पडली. त्यामध्ये अंतिम मसुदा तयार करण्यात आला आहे. आता हा मसुदा घेऊन सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली आहे. यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, मंत्री जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे, शिवेंन्द्रराजे भोसले यांनी देखील जरांगेसोबत चर्चा केली. दरम्यान जरांगे आणि विखे पाटील यांमध्ये मसुदासंबंधित सकारात्मक चर्चा होताना दिसून आली. जरांगे देखील शांतपणे विखे पाटील यांचे म्हणणे ऐकताना दिसून आले. त्यामुळे यावर चर्चेअंती तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.