मुंबई : ओबीसी कोट्यातून सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी करत मनोज जरांगेंच्या नेतृत्वात त्यांचे समर्थक मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. जरांगेंनी बेमुदत उपोषण सुरू केल्याचे जाहीर केले आहे. आरक्षणासाठी आंदोलन करत असलेल्या जरांगेंनी आता पाणीही घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. सरकार ऐकत नसेल, मागण्या मान्य होणार नसतील तर उपोषण आणखी कडक करणार. आता पाणीही पिणार नाही... आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही... असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तर डॉक्टरांनी जरांगेंना पाणी प्या, ओआरएस घ्या असा सल्ला दिला आहे.
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठका झाल्या. मुख्यमंत्र्यांनी महाधिवक्त्यांशी तसेच शिंदे समितीशी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी अनेक मुद्यांवर चर्चा केली. यामुळे सोमवारी दिवसभरात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.
वाहतूक कोंडी
जरांगे आणि त्यांचे समर्थक आंदोलन करत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महापालिकेपर्यंत जाणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. मंत्रालय परिसरातही कडेकोट बंदोबस्त आहे. यामुळे चर्चगेट - सीएसएमटी परिसरात वाहनाने प्रवास करणे कठीण झाले आहे. मागील दोन दिवस बंद असलेला इस्टर्न फ्री वे आता पुन्हा सुरू झाला आहे. या फ्री वे वरुन तसेच रेल्वेने मोठ्या संख्येने जरांगे समर्थक मुंबईत येत आहेत. यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहेत.
जरांगे समर्थकांची हुल्लडबाजी
मुंबईत जरांगे समर्थकांनी दारू पिऊन धिंगाणा केल्याच्या तसेच हुल्लडबाजी केल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. विनातिकीट रेल्वेतून प्रवास करणे, वाटेल तेव्हा दक्षिण मुंबईत रास्ता रोको तसेच रेल रोको करणे, रस्त्यावरुन वावरणाऱ्या महिलांशी गैरवर्तन करणे, रस्त्यात आंघोळ करणे, रस्त्यावर तसेच स्टेशनवर खेळून वाहतुकीला आणि कामावर जात असलेल्यांना अडथळे निर्माण करणे असे प्रकार सुरू आहेत.
जरांगे समर्थकांचा शेअर बाजारात घुसखोरीचा प्रयत्न
आंदोलनासाठी मुंबईत आलेल्या जरांगे समर्थकांनी बीएसई अर्थात शेअर बाजारात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस आणि बीएसईच्या सुरक्षा रक्षकांनी अडवून जरांगे समर्थकांना इमारतीबाहेरच ठेवले. पण या घटनेमुळे जरांगे समर्थक आंदोलन सोडून नव्या समस्या निर्माण करण्यात गुंतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी
जरांगे समर्थकांच्या हुल्लडबाजीने मुंबईकर त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात एका स्वयंसेवी संस्थेच्यावतीने जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाच्या विरोधात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर स्वयंसेवी संस्थेचे वकील, राज्याचे महाधिवक्ता आणि जरांगे गटाचे वकील यांचे युक्तिवाद सुरू आहेत.