कोकणवासीय नेहमीच प्रत्येक बाबतीत परिस्थितीला सामोरे जातो. कोकण नेहमी कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यात महाराष्ट्रात सर्वात पुढे असतात. कोकणवासीयाच्या खिशात फार काही नसलं तरी त्यातही तो गणपती उत्सव दणक्यातच करणार हे वर्षानुवर्षे घडत आले आहे. फळ बागायत असली किंवा भातशेती असली त्यात नफा, नुकसान झाले तरी गणपतीचा सण अफाट उत्साहातच तो कुटुंबासोबत साजरा करणार.
अखंड महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक प्रांतात त्या-त्या भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा होतो; परंतु कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र गणेशोत्सव हा काही प्रमुख शहरी भागात मंडळांमार्फत गणेशोत्सव साजरा केला जातो; परंतु गावो-गावी प्रत्येक गावातील वाडी-वस्तीत घरा-घरांमध्ये त्या-त्या कुटुंबाचा गणपती असतो. त्या कुटुंबातील नोकरी व्यावसायानिमित्ताने जर बाहेरगावी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक अशा शहरांमध्ये असेल किंवा परदेशात कोणी असेल त्या कुटुंबातील सदस्यही आपल्या मुळगावी घरी येणार हे या गणपती उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. यावर्षी गेले महिनाभर पावसाने एखादा दिवस उसंत घेतली. मात्र सतत पाऊस कोसळतोच आहे. गणेश चतुर्थीआधी आठवडाभर पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्याला वाटले होते गणपतीच्या सणासुदीच्या दिवसात पाऊस नसेल. पण या लहरी पावसाने नेहमीप्रमाणे चकवा दिला आणि घडल भलतच. अगदी हरितालिकेच्या दिवशी पाऊस थांबला नाही. गावो-गावी गणपती मूर्ती घरी घेऊन येणेही ग्रामस्थांना अवघड झाले. पाऊस संततधार कोसळत असल्याने लहान-मोठे व्यावसायिक या गणेशोत्सवाआधी त्यांच्या होणाऱ्या व्यवसायावर सणाला चारपैसे जास्त कमावण्याच्या मागे असतात. या सणात त्यांच्या हाती थोडे जास्त पैसे येतात; परंतु त्यातही पावसाने कहरच केला. पाऊस संततधार कोसळत असल्याने त्या छोट्या व्यावसायिकांनाही नुकसान सोसावे लागले. गणेश चतुर्थीच्या गणेश आगमनादिवशी ग्रामीण भागात गावातील आप-आपल्या वाडीतील गणपतींना नमस्कार करण्यासाठी दरवर्षी घराबाहेर पडतात; परंतु पावसाची संततधार असल्याने एक-दुसऱ्याकडे गणपती दर्शनासाठी जाणाऱ्यांना घरीच थांबावे लागले.
काही गावांतून वर्षभराने गावातील गणपती उत्सवाच्यानिमित्ताने येणाऱ्यांनी सर्वांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेण्याचे ठरवलेले असते; परंतु त्यावरही पाणी फिरले. कुणालाच घराबाहेर पडता आले नाही विशेषकरून सह्याद्री पट्ट्यांतील गावांमध्ये पावसाची संततधार आणि दाट धुके असं हे निसर्गाच विहंगमदृश्य सह्याद्री पट्ट्यातील गावातून अनुभवयाला मिळाले; परंतु पाऊस असल्याने गणेशभक्तांचा हिरमोडही झाला. हा पाऊस कधी थांबणार अशा प्रश्नाची चर्चाच सर्वत्र केली जात आहे. थोडावेळ पाऊस थांबला अस वाटत असताना अधिक जोरात पाऊस कोसळतो. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. एकीकडे सतत कोसळणारा हा पाऊस भातशेतीला कितपत पुरक ठरेल किंवा या संततधार पावसामुळे भातशेती कुजण्याची भीतीही कोकणातील शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. हवामानाच्या बेभरवशाने कोकणातील भातशेती, आंबा, काजू, कोकम, नारळ या फळ पिकांचेही गेलीकाही वर्षे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे या पावसामुळे नेमकेपणाने काय घडेल हे ठरविणेही शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. पाऊस सतत कोसळत असल्याने भातशेतीचेही गणित बिघडण्याची शक्यता वर्तविली जाते. शेवटी हवामान खात्याने वर्तविलेले अंदाज जरी खरे ठरत असले तरीही त्याचे होणाऱ्या परिणामाने जे नुकसान होणारे आहे ते नुकसान मात्र कुणालाच थांबवता येणारे नाही. कोकणातील अनेक मार्गावरील रस्तेही या अतिपावसाने खराब झाले आहेत. रस्ता कुठला आणि खड्डा कुठला असा प्रश्न पडावा अशी स्थिती काही गावातून झाली आहे. या पावसाने काही मार्गच बंद झाले. या गणेशोत्सवाच्या काळातील पावसाने काही मार्गावर पाणी आले आणि या पाण्यामुळे गावांचा संपर्क तुटण्याचे प्रकारही घडले आहेत. मात्र, तरीही कोकणवासीय कधीच डोक्याला हात लावून रडत बसत नाही. कोकणवासीय नेहमीच प्रत्येक बाबतीत परिस्थितीला सामोरे जातो. कोकण नेहमी कोणतेही सण, उत्सव साजरे करण्यात महाराष्ट्रात सर्वात पुढे असतात. कोकणवासीयाच्या खिशात फारकाही नसलं तरी त्यातही तो गणपती उत्सव दणक्यातच करणार हे वर्षानुवर्षे घडत आले आहे. फळ बागायत असेल किंवा भातशेती असली त्यात नफा, नुकसान झालेतरी गणपतीचा सण अफाट उत्साहातच तो कुटुंबासोबत साजरा करणार. यावर्षी सतत कोसळणारा पाऊस एकीकडे होता तरीही कोकणवासीयांनी गणेशोत्सव त्याच उत्साहात, थाटात आणि आनंदी वातावरणात साजरा केला.
या गणेशोत्सवाच कोकणात एक खास वैशिष्ट्य गावो-गावी गावातील वाडीत पाहायला मिळत ते म्हणजे भजनमेळे. या भजनमेळ्यांमध्ये एकाच भजन मेळ्याचे दोन, चार भजनमेळे कधी होतात ते समजत देखील नाही. बरं या भजन मंडळांची गंमत म्हणजे ही भजन मंडळ आणि त्यातली न दिसणारी स्पर्धा या कधीच कुठे दिसत नसतात; परंतु त्यात ‘आमचे भजन कसे सरस, आमच्या बुवाने घेतलेला गजर किती भारी होता याच्या गजालीही कोकणात चण्याच्या पिठाच्या करंज्या खाताना अशा काही रंगतात की यातच गणपती उत्सवाचे दिवस संपतात. अनंत चतुर्थीला किंवा पाच, सात दिवसांच्या गौरी-गणपतीच्या विसर्जनानंतर थांबलेल्या असतात. भजन मेळ्यांची फारशी न दिसणारी; परंतु अस्तित्वात असणारी स्पर्धा गणपती विसर्जनादिवशी थांबते, संपते. गणपती उत्सवात काहीसा भजन मेळ्यातील दोन-दोन मेळ्यांनी निर्माण झालेला काहीसा रूसवा, फुगवा काहीसा दुरावा संपतो आणि कोकणातील ‘म्हाळवस’ पितृ पंधरवड्याला प्रारंभ झाला की सारे रूसवे, फुगवे दूर होऊन सारे एक-दुसऱ्याकडे वडे, काळ्या वाटाण्याची आमटी, खिर अशा पदार्थांबरोबरच सोबतच्या भाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी पुन्हा वाडीतील सारी भावकी एकवटलेली असते. दरवर्षी कोकणातील गावो-गावी काहीसे कमी-अधिक प्रमाणात दिसणारे हे दृश्य असले तरीही कोकणातील गणपतीचे आगमन गणपतीच्या वास्तव्याचा पाच, सात, अकरा दिवसांचा कालावधी हे दिवस कोकणवासीयांसाठी अक्षरश: भारलेले दिवस असतात. काहीही करून कोकणवासिय आपलं गाव, घर गाठणार आणि त्याला जमेल त्या पद्धतीने कोकणवासीय अतिशय आनंदाने अमाप उत्साहाने आणि गणपती विसर्जनानंतर काहीसा भावनाविवश होत पुढच्या वर्षी लवकर या अशा जड अत:करणाने बाप्पाला निरोप देतो.
- संतोष वायंगणकर