श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा १३३ व्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून त्या १३३ वर्षपूर्तीनिमित्त १३३ लिटर आईस्क्रीमचा नैवेद्य किगा आईस्क्रीम च्या वतीने दाखविण्यात आला. यावेळी किगा आईस्क्रीम चे संचालक किरण सुरेश साळुंखे आणि गणेश राजेंद्र गोसावी यांसह ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमाचे ५ वे वर्ष होते.
गणेश गोसावी म्हणाले, साधारण आठ दिवसांमध्ये तापमानाचे प्रमाण साधत आपण संत्र्याच्या आकाराचे म्हणजेच गोलाकार स्वरूपाचे आईस्क्रीम तयार केले. हा आकार बनवत असताना आम्हाला कोल्ड स्टोरेज मध्ये उणे १८ ते २४ तापमानामध्ये थोड्या थोड्या कालावधीमध्ये जाऊन त्याला आकार देणे व तसेच त्याला व्यवस्थितपणे हाताळणे या गोष्टींच्या अडचणी येत होत्या. पण त्यावर मात करून हा छानसा महाप्रसाद आमच्याकडून तयार झाला आणि दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हा नैवेद्य बाप्पांना अर्पण करण्यात आला. सामाजिक सद्भावना मधून हा उपक्रम केला जात असून सदर प्रसादाचे वाटप गणेश भक्तांना केले जाते.