मुंबई : मनोज जरांगे आणि त्यांचे समर्थक मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी जमले आहेत. जरांगेंनी आरक्षण मिळावे म्हणून बेमुदत उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगेंशी चर्चा केली. याप्रसंगी बोलताना शिष्टमंडळाने दोन लाख ३९ हजार प्रमाणपत्र मान्य केल्याचे सांगितले. पण जरांगे त्यांच्याच मागणीवर अडून बसले आहेत. बराच वेळय चर्चा झाली पण शिंदे समिती आणि जरांगेंच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या आणि तातडीने तशी प्रमाणपत्र द्या; अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. 'मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मी हटणार नाही. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी माघारी परतणार नाही. मराठवाड्यातील एक लाख २३ हजार कुणबी गेले कुठे ?' असं जरांगे म्हणाले. 'शिंदे समितीने तेरा महिने अभ्यास केला. आता अहवाल द्यावा, आता एक मिनिटही देणार नाही, उद्या सकाळपर्यंत प्रमाणपत्र हातात द्या', असंही जरांगे म्हणाले.
जरांगेंनी ही मागणी केल्यानंतर शिंदे समितीने तातडीने एक बैठक घेण्याचा निर्णय घेतला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिंदे समितीची बैठक झाली. ही बैठक थोड्या वेळापूर्वीच संपली पण जरांगेंना अपेक्षित निर्णय झालाच नाही.