मोठी बातमी! इस्रायलने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू

  79

येमेनमधील सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधानासह अनेक प्रमुख नेत्यांचा मृत्यू 


सना: यमनची राजधानी सना येथे इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हुथींच्या नियंत्रणाखालील सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. बंडखोर सशस्त्र गट हुथींनी शनिवारी एका निवेदनात म्हटले आहे की गुरुवारी झालेल्या हल्ल्यात अल-राहवी यांच्यासह इतर अनेक मंत्र्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षभरातील सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी एका कार्यशाळेत सहभागी होत असताना हा हल्ला झाला, असे गटाने म्हटले आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्ल्याच्या वेळी हुथी संरक्षण मंत्री मोहम्मद अल-अती आणि लष्करी प्रमुख मोहम्मद अब्द अल-करीम अल-घमारी हे देखील राहावी यांच्यासोबत कार्यशाळेत उपस्थित होते. दोघांचाही मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप तरी हुथीं गटाने दोघांच्याही मृत्यूची पुष्टी केलेली नाही.



इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सैनिकांचा मृत्यू


इराण समर्थित सशस्त्र गट हुथींनी २८ ऑगस्ट रोजी येमेनमधून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायली हवाई दलाने हुथींच्या नियंत्रणाखालील सना येथे बॉम्बहल्ला केला आणि बंडखोर गटाच्या लष्करी तळांवर तसेच राष्ट्रपतीभवनवर  हल्ला केला. वृत्तानुसार, इस्रायली हवाई हल्ल्यात किमान १० हुथी कमांडर आणि सैनिक मारले गेले आणि ९० हून अधिक जखमी झाले आहेत.


गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान हुथी बंडखोर पॅलेस्टाईनचे सर्वात कट्टर समर्थक आहेत. गेल्या काही महिन्यांत, त्यांनी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले आहेत आणि दावा केला आहे की हे हल्ले पॅलेस्टाईन लोकांशी एकता दर्शविण्यासाठी केले गेले होते. यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन इस्रायलच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच रोखले.



हुथी बंडखोरांकडून इस्रायलच्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य


हुथी बंडखोरांचा हा संघर्ष लाल समुद्रातही पसरला आहे, जिथे हुथी बंडखोरांनी इस्रायलच्या व्यावसायिक जहाजांना लक्ष्य केले आहे. प्रत्युत्तरादाखल, इस्रायलने येमेनची राजधानी साना आणि महत्त्वाचे बंदर शहर होदेइदासह हौथींच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागांवर वारंवार हल्ले केले आहेत. मे महिन्यात झालेल्या अशाच एका इस्रायली हवाई हल्ल्यात सनाचे विमानतळ उद्ध्वस्त करण्यात आले होते.


अमेरिकेने मे महिन्यात हूथीशी करार केला होता, ज्यात म्हंटले होते बंडखोरांनी लाल समुद्रात जहाजांना लक्ष्य करणे थांबवल्यास  इस्रायल हवाई हल्ले थांबवतील. मात्र हूथींनी त्याचे उल्लंघन केले.



हूथी कोण आहेत आणि त्यांचा हेतू काय आहे?


हूथी , ज्यांना अन्सार अल्लाह (अल्लाहचे समर्थक) म्हणूनही ओळखले जाते, ते शिया जैदी मुस्लिम (येमेनची लोकसंख्या सुमारे ३५% शिया आणि ६०% सुन्नी) बंडखोर गट आहे जो येमेनमध्ये सक्रिय आहे. हा गट १९९० च्या दशकात उत्तर येमेनमधील सादा प्रांतात उदयास आला. या गटाचे नाव त्याचे संस्थापक हुसेन बद्रुद्दीन अल-हूथी यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ज्यांनी २००४ मध्ये येमेनचे तत्कालीन अध्यक्ष अली अब्दुल्लाह सालेह यांच्या राजवटीविरुद्ध भ्रष्टाचार आणि सौदी अरेबिया आणि अमेरिकेच्या पाठिंब्याचा आरोप करून चळवळ सुरू केली होती आणि त्याच वर्षी येमेनी सैन्याने त्यांची हत्या केली होती. आता या गटाचे नेतृत्व अब्दुल मलिक अल-हूथी करत आहेत.


हुथी येमेनमध्ये शिया समुदायाच्या हक्कांचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात, सुन्नी सलाफी विचारसरणीच्या विस्ताराला विरोध करतात आणि स्वतंत्र राज्य स्थापन करतात. ते लोकशाही, गैर-सांप्रदायिक प्रजासत्ताकाला पाठिंबा देण्याचा दावा देखील करतात. २०१४ मध्ये, हुथी बंडखोरांनी येमेनची राजधानी साना आणि देशाचा मोठा भाग ताब्यात घेतला, त्यानंतर येमेनमध्ये गृहयुद्ध सुरू झाले. ते लाल समुद्राच्या किनारी भागांवर नियंत्रण ठेवतात आणि तेथून जाणाऱ्या व्यावसायिक जहाजांवर हल्ला करतात.



हुथी गटाचे इस्रायलशी शत्रुत्व का आहे?


संयुक्त राष्ट्रांच्या मते, २०१० पर्यंत हुथींकडे सुमारे १.२५ लाख सैनिक होते. ते ड्रोन, क्षेपणास्त्र आणि समुद्री हल्ले करण्यास सक्षम आहेत. अमेरिका, इस्रायल आणि सौदी अरेबिया हे दोन्ही देशांचे सामान्य शत्रू असल्याने, हुथींना इराणकडून शस्त्रे, प्रशिक्षण आणि निधी मिळत असल्याचा आरोप आहे. हिजबुल्लाह त्यांना प्रशिक्षण देखील देतो. ते इस्रायलला पॅलेस्टिनी लोकांवर जुलूम करणारा प्रांत मानतात आणि गाझामध्ये हमासला पाठिंबा देतात. हुथींचा नारा आहे, 'देव महान आहे, अमेरिका आणि इस्रायल नष्ट झाले पाहिजेत, यहुदी नष्ट झाले पाहिजेत आणि इस्लामचा विजय झाला पाहिजे'.

Comments
Add Comment

युक्रेनच्या माजी संसद सभापतींची गोळ्या घालून हत्या

ल्विव्ह: पश्चिम युक्रेनमध्ये एका प्रमुख युक्रेनियन राजकारणी आणि माजी संसद सभापतींची अज्ञात हल्लेखोरांकडून

Trump is Dead सोशल मीडियावर होतंय प्रचंड ट्रेंड!

वॉशिंग्टन डीसी: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बने जगातील अनेक देशातील आर्थिक

पंतप्रधान मोदी सात वर्षांनंतर चीन दौऱ्यावर, जिनपिंग आणि पुतिनना भेटणार

तियानजिन : जपानच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या दौऱ्यावर आहेत. ते विशेष विमानाने

५०० हून अधिक ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रांचा मारा... रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला,

कीव: रशियाने युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला उधळून लावत त्याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनवर ड्रोन हल्ले

Trump Tarrif: ट्रम्प यांना घरचा आहेर! अमेरिकन न्यायालयानेच टॅरिफला केले बेकायदेशीर घोषित

ट्रम्प यांच्या आर्थिक धोरणांना मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयात घेणार धाव वॉशिंग्टन डीसी:  ट्रम्प टॅरिफमुळे

दक्षिण कोरियात शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी

सियोल : दक्षिण कोरियामध्ये शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर झाले आहे. मार्च २०२६ पासून हा कायदा