मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या घरी जऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळ बातचीत झाली. राज ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. याप्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना 'राज को राज रहने दो' असे सूचक उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेची माहिती देणे टाळले. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरेंच्या घरी गणपती दर्शनाला यंदा पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आले होते. यानंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू महापालिका निवडणुकांसाठी युती करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी बातचीत केली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
काही दिवसांपूर्वी बेस्ट पतपेढीची निवडणूक झाली. या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती असूनही त्यांचा दारुण पराभव झाला. अनेक वर्षे बेस्ट पतपेढीची सत्ता राखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या समर्थकांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. दोन्ही नेत्यांनी राज ठाकरेंशी चर्चा केली.