नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांनी आज, बुधवारी देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विटरवर (X) लिहीलेल्या पोस्टमध्ये म्हंटले की, "देश-विदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! हा महापर्व बुद्धी आणि विवेकाचे प्रतीक असलेल्या भगवान श्री गणेशांच्या जन्मोत्सव म्हणून आनंदाने साजरा केला जातो.विघ्नहर्ता भगवान श्री गणेश यांच्याकडे प्रार्थना करते की, ते व्यक्तिमत्त्वनिर्माण व राष्ट्रनिर्माणाच्या वाटचालीतील सर्व अडथळे दूर करो. त्यांच्या आशीर्वादाने सर्व देशवासी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून सशक्त भारताच्या निर्मितीसाठी निष्ठेने कार्यरत राहोत असे राष्ट्रपती म्हणाल्यात.
तर पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! श्रद्धा आणि भक्तिभावाने परिपूर्ण हा पवित्र सण प्रत्येकासाठी मंगलदायक ठरो. भगवान गजानन सर्व भक्तांना सुख, शांती आणि उत्तम आरोग्य देऊदे, हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया!" असे त्यांनी नमूद केले. तसेच रक्षामंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "गणेश चतुर्थी या पवित्र सणानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा! विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी निर्माण करो. त्यांच्या कृपेने भारत सदैव एकता, सौहार्द आणि विकासाच्या मार्गावर पुढे जात राहो असे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
यासोबतच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या संदेशात म्हणाले की, विघ्नहर्ता भगवान श्री गणेश यांची आराधना करण्याच्या 'श्री गणेश चतुर्थी' या पवित्र सणानिमित्त सर्व श्रद्धाळूंना आणि राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा! भगवान सिद्धिविनायक सर्वांना सुख-समृद्धी आणि उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देवो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे. तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सर्व सिद्धी प्रदान करणारे, प्रथम पूज्य भगवान श्री गणेश यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाच्या जीवनात शुभ-लाभ येवो. आपला देश प्रगतीपथावर निरंतर पुढे जात राहो असे त्यांनी नमूद केले आहे.