नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल करुन घेतल्या. या दोन नवीन स्टेल्थ फ्रिगेट्समध्ये ७५ टक्क्यांहून अधिक स्वदेशी आहे. यामुळे संरक्षण उत्पादनात मोदी सरकारच्या 'आत्मनिर्भरता' मोहिमेला चालना मिळण्यास मदत झाली आहे. देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ झाली आहे. संरक्षणाच्या बाबतीतले भारताचे स्वावलंबित्व वाढले आहे.
आयएनएस उदयगिरी मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) बांधली आहे तर आयएनएस हिमगिरी कोलकाता येथील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सने (जीआरएसई) बांधली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा भारताचे वाढते जहाजबांधणी कौशल्य आणि भारतातील प्रमुख संरक्षण शिपयार्डमधील समन्वय सिद्ध झाला. उदयगिरी आणि हिमगिरी या प्रोजेक्ट १७ (शिवालिक) श्रेणीतील फ्रिगेट्स आहेत. या दोन्ही जहाजांमध्ये आधुनिक डिझाइन, रडारपासून अस्तित्व लपविणारे स्टेल्थ तंत्रज्ञान, शस्त्रे आणि सेन्सर सिस्टीम आहे. निळ्याशार पाण्यात मोठी मोहीम यशस्वी करण्याचे सामर्थ्य आहे. आयएनएस उदयगिरी ही भारताची आतापर्यंतची सर्वाधिक वेगवान फ्रिगेट आहे.
दोन्ही फ्रिगेट्सना पूर्वीच्या आयएनएस उदयगिरी (एफ३५) आणि आयएनएस हिमगिरी (एफ३४) वरून नावे देण्यात आली आहेत. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर जुन्या आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या फ्रिगेट्स निवृत्त झाल्या आणि आता नव्या आयएनएस हिमगिरी आणि आयएनएस उदयगिरी या दोन निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल झाल्या. दोन्ही फ्रिगेट्सची रचना भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने (WDB) केली आहे. उदयगिरी हे वॉरशिप डिझाइन ब्युरोने डिझाइन केलेले १०० वे जहाज आहे.
कार्यान्वीत होताच आयएनएस उदयगिरी आणि आयएनएस हिमगिरी या फ्रिगेट्स नौदलाच्या पूर्वेकडील ताफ्यात सहभागी झाल्या आहेत. हिंद महासागरातील देशाच्या हितांचे रक्षण करण्यासाठी या फ्रिगेट्स काम करतील.