सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे
गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर जास्वंदाच्या फुलाच्या आकाराचे मोदक खूप आकर्षक दिसतात आणि चवीलाही अप्रतिम लागतात.
साहित्य :
सारणासाठी
किसलेला नारळ : २ वाट्या
गूळ : १ १/२ वाटी
वेलचीपूड : १/२ टीस्पून
थोडे तूप
उकडीसाठी
तांदळाचे पीठ : २ वाट्या
बीटरूट पाणी : २ वाट्या
मीठ : चिमूटभर
तूप : १ टीस्पून
कृती :
१. सारण तयार करणे :
कढईत थोडं तूप गरम करून त्यात नारळ आणि गूळ घाला.
गूळ छान विरघळला की हलवून मिश्रण थोडं घट्ट होऊ द्या.
शेवटी वेलचीपूड घालून सारण थंड करायला ठेवा.
२. उकड तयार करणे :
बीटरूट किसून त्यात पाणी घालून अर्धा तास ठेवायचे.
या पाण्यात मीठ व तूप घालून उकळी आणा.
त्यात तांदळाचे पीठ टाकून ढवळा आणि झाकण ठेवून ५ मिनिटे वाफवून घ्या.
गॅस बंद करून मिश्रण कोमट झाल्यावर मळून गुळगुळीत उकड
तयार करा.
३. जास्वंद आकाराचे मोदक घडवणे :
उकडीचा एक गोळा घ्या, त्याची पातळ पारी (मोदकाची कवच) लाटून घ्या.
त्यात सारण टाकून ५ मोठ्या कळ्या पडाव्या. या कळ्या पूर्ण बंद करून झाल्यावर आता एका एका कळीला कडेकडेने हलकेच जास्वंदाच्या पाकळ्यांसारखे फोल्ड द्या. पाकळ्यांच्या टोकाला बारीक करून मध्यभागी एकत्र आणा म्हणजे अगदी जास्वंदासारखा आकार दिसेल.
४. वाफवणे :
तयार मोदकांना वाफेवर १०-१२ मिनिटे
शिजवून घ्या.
वाफवल्यावर त्यावर
तुप सोडावे.
असे जास्वंद आकाराचे मोदक बाप्पालाही
नक्की आवडतील.