धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या पत्नीने अंडाकरी बनवण्यास नकार दिल्याने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळी सिहावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संकरा गावात घडली आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक ४० वर्षीय टिकुराम सेन सोमवारी संध्याकाळी काही अंडी घेऊन घरी आला होता. त्याने आपल्या पत्नीला अंड्याची करी बनवण्यास सांगितले. मात्र, पत्नीने 'करू भात' या स्थानिक सणाचे कारण देत अंड्याची भाजी बनवण्यास स्पष्टपणे नकार दिला. या सणामध्ये मांसाहारी पदार्थ खाल्ले जात नाहीत, असे तिने सांगितले.
क्रोध आणि टोकाचे पाऊल
पत्नीच्या या नकारामुळे टिकुरामला खूप राग आला. रागाच्या भरात तो घरातून बाहेर पडला. बराच वेळ तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर काही वेळाने त्याचा मृतदेह गावाजवळ एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पुढील तपास सुरू
कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.