अवतरली...लाडाची नवसाची गौराई माझी

  30

सौंदर्य तुझं : प्राची शिरकर


गणेशोत्सवात गौरीपूजन हा स्त्रियांसाठी अत्यंत मंगलमय व आनंदाचा सण मानला जातो. भाद्रपदातील गौरी आगमन हा प्रत्येक घरातील आनंदाचा क्षण मानला जातो. मंगलमय वातावरणात गौरीला घरात आणले जाते आणि तिच्या स्वागतासाठी पारंपरिक रितीरिवाज पाळले जातात. आगमनाच्या दिवशी गौरीला साडी, दागिने, गजरे आणि फुलांच्या हारांनी सजवले जाते. तिचा पारंपरिक शृंगार हा सौंदर्य आणि श्रद्धेचा संगम मानला जातो. काजळ, बिंदी, हिरव्या बांगड्या आणि सोन्याच्या दागिन्यांनी गौरीची शोभा अधिक खुलते. या सणात गौरीला नववधूसारखे रूप दिले जाते. या शृंगारामागे केवळ अलंकार नव्हे तर मंगल, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक दडलेले असते. त्यामुळे गौरी आगमन आणि तिचा पारंपरिक शृंगार हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून, पिढ्यांपिढ्या चालत आलेल्या परंपरेचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक सोहळा आहे. या लेखातून आपण जाणून घेऊया गौरीचा पारंपरिक शृंगार आणि अलंकार...


वस्त्र शृंगार
गौरीला नेसवण्यासाठी पारंपरिक साड्यांचा वापर केला जातो. पैठणी, नऊवारी, रेशमी किंवा कापडी साड्या प्रचलित आहेत. झरीकाम, मोर, कमळ, वेली यांसारख्या डिझाईन्सच्या साड्या गौरीच्या सौंदर्यात भर घालतात. काही ठिकाणी आधुनिकता आणि परंपरेचा संगम साधण्यासाठी नव्या डिझाईनच्या पण पारंपरिक टच असलेल्या साड्या गौरीसाठी वापरल्या जातात.



केश शृंगार
स्त्रीच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे केशसजावट. गौरीच्या वेणीत मोगऱ्याचे गजरे, गुलाब, शेवंतीची फुले गुंफली जातात. फुलांचा सुगंध व पांढऱ्या मोगऱ्याची शोभा गौरीच्या रूपाला दिव्यता प्रदान करते. काही ठिकाणी सुवर्णकाठाची वेणीसुद्धा वापरली जाते.



मुख शृंगार
गौरीच्या कपाळावर कुंकवाचा ठिपका व लाल बिंदी लावली जाते. यामुळे देवीचे रूप मंगलमय दिसते. डोळ्यांना काजळ लावून अधिक उठावदार केले जाते. काही ठिकाणी पारंपरिक मेकअप, गुलालाचा हलका रंग, हळदीचा पिवळसर टोन वापरला जातो.



फुलांचा शृंगार
फुलांचा शृंगार हा सर्वात सुंदर व नैसर्गिक मानला जातो. फुलांचे हार, गजरे, माळा वापरून गौरीला सजवलं जातं. मोगरा, गुलाब, झेंडू व कमळाची फुले प्रामुख्याने वापरली जातात. ही फुले केवळ शोभेसाठी नाहीत तर त्यामध्ये सुगंध, पवित्रता आणि निसर्गाचा आशीर्वाद दडलेला असतो.



अलंकार शृंगार
मंगळसूत्र : गौरीला मंगळसूत्र घालणे हे वैवाहिक सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रावर सोन्याच्या डिझाईन्स असलेले अलंकार पारंपरिक पद्धतीने वापरले जातात.
नथ : मराठमोळ्या परंपरेतील नथ ही स्त्रियांच्या सौंदर्याची ओळख आहे. गौरीला मोत्यांची किंवा सोन्याची नथ लावल्यास त्या अधिक सुंदर दिसतात.
बांगड्या : हिरव्या काचा, सोन्याच्या किंवा रंगीबेरंगी बांगड्या गौरीच्या हातात घालतात. बांगड्या हे स्त्रीच्या सौंदर्याचे व मंगलाचे प्रतीक आहे.
हार व माळा : गौरीला सोन्याचे किंवा कृत्रिम हार घालतात. माळा, चोकर, कोल्हापुरी साज, ताम्हन माळा असे विविध पारंपरिक दागिने गळ्यात घालण्याची पद्धत आहे.
कर्णफुले : पारंपरिक झुमके, बोरमाल, मोत्यांची कर्णफुले गौरीला घालतात. कानातील अलंकारामुळे गौरीच्या चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.
कंबरपट्टा : गौरीला सोन्याचा किंवा चांदीचा कंबरपट्टा घातल्यास त्यांचे रूप अधिक आकर्षक दिसते. काही ठिकाणी कपड्याचा सुंदर कंबरपट्टा वापरतात.


Comments
Add Comment

दृकश्राव्य माध्यमातील सृजनशील दुवा

कर्तृत्ववान ती राज्ञी : उमा दीक्षित आज हरतालिका या दिवसाचे औचित्य साधून, गेली तीन दशके अखंड व्रतस्थ

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर

समाधी अवस्था

मी योगिनी : डॉ. वैशाली दाबके आपण मागील काही लेखांत योगदर्शनातील धारणा, ध्यान या अंतरंगयोगातील दोन महत्त्वाच्या

हर तन तिरंगा

तिरंगी फॅशन ट्रेंड!  सौंदर्य तुझं : प्राची शिरकर स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा उत्सव!

दिव्यांगांसाठी आदर्श ‘घरकुल’

वैशाली गायकवाड डोंबिवलीपासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या खोणी गावात, एका सेवाभावी प्रयत्नातून साकारले

गरोदरपणातला मधुमेह

स्त्री आरोग्य : डॉ. स्नेहल पाटील गर्भधारणा हा स्त्रीच्या आयुष्यातील एक अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाचा काळ असतो.