
हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने आपल्या ५ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्घृणपणे हत्या केली आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तुकडे केले. आरोपी पतीला पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावताना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र नावाच्या व्यक्तीने आपली पत्नी स्वाती हिची हत्या केली. स्वाती ही २१ वर्षांची असून, ती ५ महिन्यांची गर्भवती होती. स्वाती आणि महेंद्र हे मूळचे विक्रमबाद जिल्ह्यातील असून, त्यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर ते हैदराबादमधील बालाजी हिल्स परिसरात राहत होते.
पोलिसांना मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी महेंद्रला रंगेहाथ पकडले. त्याने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले होते आणि ते मुशी नदीत फेकून देण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेहाचे तुकडे जप्त केले असून, महेंद्रला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या क्रूर कृत्यामागे नेमके काय कारण होते, याचा पोलीस शोध घेत आहेत.