नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला.
मुलगा खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्याच्यावर हल्ला केला. मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी कुत्रा चावल्याच्या खुणा दिसत आहेत. कत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेला मुलगा ओरडू आणि रडू लागला. मुलाचा आवाज ऐकून परिसरात उपस्थित असलेल्या एका पोलिसाने घटनास्थळी धाव घेतली आणि मुलाची सुटका केली. यानंतर मुलाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे मुलाची प्रकृती स्थिर आहे.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतल्या भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक निर्णय दिला आहे. या निर्णयानुसार भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केली जाईल तसेच त्या कुत्र्यांना विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिली जातील. यानंतर ज्या भागातून पकडून आणले होते त्याच भागात परत सोडले जाईल. जे कुत्रे आक्रमक असतील त्यांना नसबंदी केल्यानंतर आणि विशिष्ट वैद्यकीय इंजेक्शन दिल्यानंतर कुत्र्यांसाठीच्या आश्रयगृहात ठेवले जाईल. भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालता येणार नाही, यासाठी प्रशासनाला ठिकठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागेल. नेमून दिलेल्या जागेवर कुत्र्यांना खाऊ घालता येईल, असेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. अनेकांनी या आदेशाचे स्वागत केले होते. भटक्या कुत्र्यांच्या प्रकरणात एक संतुलीत निर्णय देण्यात आल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती. या घटनेला काही दिवस होत नाहीत तोच दिल्लीत भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला.