Sunday, October 26, 2025
Happy Diwali

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

गणेशोत्सवासाठी प्लास्टिक फुलांची दुकाने सजली...!

फुलशेती कोमेजली, शासनाने प्लास्टिक फूल, हार विक्रीवर बंदी घालावी

श्रीरामपूर : एकीकडे प्लास्टिक बंदीचा जागर सुरू असतानाच सणामध्ये प्लास्टिक फुलांमुळे नैसर्गिक फुलांकडे कोणी बघत नाही. नैसर्गिक फुलांऐवजी सर्वत्रच हार, तुरे, फुले प्लास्टिकचे वापरला जाऊ लागला आहे. त्यामुळे फुलशेती करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवात फुलांना अधिक महत्त्व असते. त्यामुळे सर्वत्रच फुलांना चांगली मागणी होती. ही मागणी ओळखूनच अलीकडे फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला होता.

यात प्रामुख्याने झेंडू, निशिगंधाची शेती अधिक केली जाते. परंतु या फुलशेतीच्या मुळावर प्लास्टिक फुले आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. चार-पाच वर्षापूर्वी झेंडू आणि निशिगंधला चढ्या दराने मागणी होती. दसरा, गौरी-गणपती, आणि झेंडूला प्रतिकिलो ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत दर मिळत होता, तर निशिगंधला प्रतिकिलो २०० रुपयांपासून काही हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र विविध उत्सवात प्लास्टिक फुलांचा वापर वाढला आहे. घरगुती गौरी गणपतीसह सार्वजनिक गणेशोत्सवातील आरास सजावटीसाठीही प्लास्टिक फुलांच्या माळांचा वापर वाढला आहे. केवळ सणासुदीत फुले, माळा व गजरे विक्री करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. या शिवाय पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये लाखो रुपयांचा खर्च करून फुलशेती केली जाते. फुलांना भाव मिळाला नाही, तर शेतकरी आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. अनेक बेरोजगार युवकांचा फुलशेती करण्याकडे कल वाढला आहे. अडीच-तीन महिन्यांच्या फुलशेतीसाठी रोज २४ तास राबावे लागत होते. बाजारात फुले घेऊन गेल्यानंतर दलालांचाही सामना करावा लागतो. त्यातच प्लास्टिक फुलांमुळे बेरोजगार युवकांवर पुन्हा बेकारीची वेळ आली आहे. त्यामुळे सरकारने प्लास्टिक फुलांच्या विक्रीवर बंदी घालावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.प्लास्टिक फुलांमुळे झेंडूच्या फुलांना मागणी कमी झाली. प्रतिकिलो ५ ते १० रुपये मिळतो. उत्पादन खर्चही त्यातून निघत नाही. आर्थिक नुकसान सहन करावे लागले. अनेक वेळा फुलांना दर मिळत नसल्याने फुले रस्त्यावर फेकण्याची वेळ येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

Comments
Add Comment