महेश देशपांड
बँकांमध्ये चेक जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल करून रिझर्व्ह बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे. याचा फायदा सामान्यतः चेकने पैसे देणाऱ्यांना होईल. आपल्या देशातील बँकिंग प्रणालीमध्ये ‘चेक क्लिअरन्स’ला बराच वेळ लागतो. म्हणजेच चेकने पेमेंट केल्यानंतर पैसे खात्यात येण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात. या विलंबामुळे सामान्यतः चेकने पेमेंट देणाऱ्या किंवा घेणाऱ्या लोकांना किंवा व्यावसायिकांना त्रास होतो.
तथापि, आता असे होणार नाही. क्लिअरन्स सिस्टीम वेगवान होईल. भारतीय रिझर्व्ह बँक जलद ‘क्लिअरन्स सिस्टीम’ सुरू करणार आहे. याद्वारे चेक जमा केल्यानंतर काही तासांमध्येच खात्यात पैसे येतील. ४ ऑक्टोबरपासून ‘चेक क्लिअरन्स’ प्रक्रियेत लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होईल. हा बदल ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ (सीटीएस) अंतर्गत होईल. आतापर्यंत चेक क्लिअर होण्यासाठी टी+१ पर्यंत म्हणजे पुढील कामकाजाच्या दिवसापर्यंतचा वेळ लागत असे. चेक दुसऱ्या बँकेचा असेल तर वठायला तीन दिवस लागतात; मात्र आता संपूर्ण क्लिअरन्स प्रक्रिया काही तासांपर्यंत मर्यादित असेल.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार ही नवी प्रणाली ‘क्लिअरिंग अँड सेटलमेंट ऑन रियलायझेशन’ म्हणून ओळखली जाईल. म्हणजेच, बँकांमध्ये काम करताना क्लिअरिंग सतत सुरू राहील. आतापर्यंत ‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ (सीटीएस) अंतर्गत बॅचमध्ये धनादेश प्रक्रिया केली जात असल्याने क्लिअरन्समध्ये वेळ लागत होता. नवीन प्रणालीअंतर्गत सकाळी दहा ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत बँकेत जमा केलेले धनादेश स्कॅन केले जातील आणि त्वरित क्लिअरिंग हाऊसमध्ये पाठवले जातील. यामुळे प्रक्रिया वेगवान होईल. दुसऱ्या टप्प्यात नियम अधिक कडक असतील. नवी प्रणाली दोन टप्प्यांमध्ये लागू केली जाईल.
पहिला टप्पा ४ ऑक्टोबर रोजी सुरू होईल तर दुसरा टप्पा तीन जानेवारी २०२६ रोजी सुरू होईल. पहिल्या टप्प्यात बँकांना संध्याकाळी ७ वाजेपर्यंत धनादेशांची सकारात्मक किंवा नकारात्मक पडताळणी करावी लागेल. वेळेवर पडताळणी न झालेल्या धनादेशांना मान्यताप्राप्त मानले जाईल आणि सेटलमेंटमध्ये समाविष्ट केले जाईल. त्याच वेळी, दुसऱ्या टप्प्यात नियम अधिक कडक केले जातील. यामध्ये धनादेशाची पडताळणी तीन तासांच्या आत करावी लागेल.
बँकेला सकाळी १० ते ११ दरम्यान धनादेश मिळाल्यास पडताळणीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत वेळ मिळेल. सेटलमेंट पूर्ण झाल्यानंतर क्लिअरिंग हाऊस बँकेला पुष्टीकरण तपशील पाठवेल आणि ग्राहकांच्या खात्यात ताबडतोब पैसे पाठवले जातील. याचा उद्देश सेटलमेंटचा धोका कमी करणे, कार्यक्षमता सुधारणे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा प्रदान करणे हा आहे.
आणखी एक लक्षवेधी अर्थवृत्त म्हणजे भारतीय सिंगल माल्ट व्हिस्की आता भारतामध्येच नाही, तर जगभरात धुमाकूळ घालत आहे. चार वर्षांपूर्वी हरियाणा येथील ‘पिकाडिली ॲग्रो इंडस्ट्रीज’ने ‘इंद्री’ नावाच्या ब्रँडची दारू तयार केली. २०२४मध्ये भारतात सर्वाधिक विक्री होणारी ती सिंगल माल्ट व्हिस्की बनली आहे. त्यामुळे आपोआपच या दारूने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. दारूच्या या ब्रँडने ग्लेनलिव्हेट आणि ग्लेनफिडीचसारख्या प्रतिष्ठित स्कॉच ब्रँडनादेखील मागे टाकले आहे.
आता फक्त अमरुत आणि पॉल जॉनच नाही, तर नव्याने बाजारात आलेले इंद्री आणि रामपूर या ब्रँड्सनेदेखील बाजारात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सर्वांमध्ये ‘इंद्री’ने आघाडी घेतली आहे. ‘आयडब्ल्यूएसएस ड्रिंक्स मार्केटच्या रिसर्च रिपोर्ट’नुसार २०२४ मध्ये पहिल्यांदाच भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीची विक्री ही स्कॉचपेक्षा अधिक झाली आहे. याला कमी किंमत आणि उच्च गुणवत्ता कारणीभूत असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. ग्राहक आता स्कॉचऐवजी ‘इंडियन सिंगल माल्ट’ला प्राधान्य देत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ‘इंद्री’ने विक्रीचे एक नवे रेकॉर्ड बनवले आहे. या दारूला जगात सर्वाधिक गतीने विक्रीमध्ये वाढ झालेला ब्रँड अशी नवी ओळख मिळाली आहे.
आता एक बातमी ट्रम्प महाशयांची मस्ती जिरवणारी. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आयातशुल्क लादत असताना स्वतः अमेरिका मात्र रशियाकडून खरेदी करत असल्याबद्दल अलीकडेच एका पत्रकाराने ट्रम्प यांना सवाल केला होता. तेव्हा त्यांनी याबाबत नीट माहिती नसल्याचे निर्लज्ज विधान केले होते. भारताने ट्रम्प यांचा दुटप्पीपणा उघडकीस आणला होता. आतापर्यंत त्यावर मौन बाळगणाऱ्या ट्रम्प यांनी अमेरिका रशियाकडून विविध वस्तू खरेदी करत असल्याची कबुली दिली. अलास्कामध्ये बैठक झाल्यानंतर ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पुतीन यांनी ट्रम्प सत्तेत आल्यापासून रशिया आणि अमेरिका यांच्यातील व्यापार वाढला आहे. अशा परिस्थितीत ट्रम्प यांची अमेरिका रशियाकडून तेल खरेदी करत असताना इतर देशांवर दुय्यम शुल्क का लादत आहे, असा मुद्दा उपस्थित केला. हा व्यापार सुमारे वीस टक्क्यांनी वाढला असल्याचेही त्यांनी दाखवून दिले. रशियाशी व्यापार करू नये म्हणून ट्रम्प इतर देशांवर दबाव आणत आहेत; परंतु ते स्वतः रशियाशी व्यापार थांबवू शकत नाहीत कारण अमेरिका रशियाशी बराच व्यापार करते. द्विपक्षीय व्यापार थांबवल्यास त्यांची अर्थव्यवस्था आणखी कोलमडू शकते. कारण टॅरिफच्या घोषणेपासून आर्थिक आघाडीवर अमेरिकेसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. अशा परिस्थितीत अमेरिका आपल्या मोठ्या व्यापार भागीदारांपैकी एकाला गमावण्याचा मोठा धोका पत्करू शकत नाही.
अमेरिका रशियासोबतचा व्यापार थांबवू शकत नाही, कारण ती रशियाकडून अशा काही गोष्टी आयात करते, ज्यांच्या अभावामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होऊ शकते. अमेरिकन जनगणना ब्युरोच्या आकडेवारीनुसार या वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये अमेरिकेने ९२७ दशलक्ष डॉलर किमतीचे खत आयात केले. गेल्या वर्षी रशियाकडून होणारी खत आयात एकूण एक अब्ज डॉलरपेक्षा जास्त होती. तीन प्रकारच्या रासायनिक खतांच्या आयातीसाठी अमेरिका रशियावर अवलंबून आहे. यामध्ये युरिया, युरिया अमोनियम नायट्रेट (यूएएन) आणि पोटॅशियम क्लोराईड म्युरेट ऑफ पोटॅशसारख्या खतांचा समावेश आहे.
याशिवाय अमेरिका रशियाकडून पॅलेडियमची आयातदेखील करते. तथापि, २०२१ पासून रशियाकडून पॅलेडियमची आयात लक्षणीयरीत्या कमी झाली आहे; तरीही आकडेवारीवरून असे दिसून येते, की अमेरिकेने २०२४ मध्ये ८७८ दशलक्ष डॉलर आणि या वर्षी जून २०२५ पर्यंत ५९४ दशलक्ष डॉलर आयात केली आहे. चांदीसारखा दिसणारा हा धातू विविध इलेक्ट्रॉनिक आणि औद्योगिक उत्पादनांमध्ये वापरला जातो आणि कारच्या उत्प्रेरक कन्व्हर्टरमध्ये एक प्रमुख घटक आहे. अमेरिकेने रशियाकडून ७५५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे युरेनियम आणि प्लुटोनियम आयात केले आहे.
समोर आलेल्या आणखी एका खास बातमीनुसार भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ला शंभर दिवस पूर्ण होत असताना आर्थिक स्थिती ढेपाळली नाही, तर देशाला २३.४७ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या काळात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झाला नाही. यानंतरही शेअर बाजाराच्या मूल्यांकनात ५.५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण मूल्यांकनातही वाढ झाली आहे. पहिल्या तिमाहीमध्ये देशातील कंपन्यांचे निकाल थोडे चांगले दिसले आहेत. त्याचा परिणाम त्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून आला आहे. यामुळे त्यांचे मूल्यांकन वाढले आहे. येत्या काळात शेअर बाजाराच्या मूल्यांकनात आणखी वाढ होऊ शकते.