
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता सुरू झाली आहे. याच दरम्यान, मुंबई गोवा हायवेवर मोठी दुर्घटना घडली आहे. कोकणात जाणाऱ्या लक्झरी बसला कशेडी घाटाजवळ आग लागल्याची घटना घडली आहे.
रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. ही बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही हे सुदैव.
मिळालेल्या माहितीनुसार, या बसमध्ये ४० ते ४५ प्रवासी प्रवास करत होती. ही बस मुंबई येथून मालवणच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली. कशेडी बोगद्याजवळ असताना या बसचा टायर खूप गरम झाला आणि त्याने अचानक पेट घेतला. दरम्यान ही आग वेगाने पसरत असताना बस ड्रायव्हरच्या हे लक्षात आले. त्यानंतर तातडीने प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. पाहता पाहता ही आग इतकी प्रचंड पसरली की संपूर्ण बसची जळून खाक झाली.
या दुर्घटनेनंतर या प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढे रवाना करण्यात आले. गणेशोत्सवानिमित्त हे चाकरमनी मोठ्या सामानासह कोकणात निघाले होते. मात्र बसच्या डिकीत प्रवाशांचे सामान होते आणि हे सामान काढण्याआधी बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मात्र यात नुकसान झाले.