ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी एमएमआरडीए उड्डाणपूल बांधणार आहे. उड्डाणपुलाचा डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा काढली आहे. प्रस्तावीत उड्डाणपुलामुळे दीड तासाचे अंतर फक्त २५ मिनिटांत पार करता येईल, असे एमएमआरडीएने सांगितले. उड्डाणपूल बांधल्यामुळे भिवंडी परिसरातील गोदामांमधून होणारी मालवाहतूक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शिळफाटा, पलावा, डोंबिवली, कल्याण ही वाहतूक कोंडीसाठी बदनाम असलेली ठिकाणं आहेत. याच रस्त्यावरून काटईमार्गे अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गावर कोळेगाव, खोणी, नेवाळी आणि अंबरनाथ शहराच्या वेशीवर पण वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे प्रचंड वेळ वाया जातो. वेळ, इंधन आणि श्रम मोठ्या प्रमाणावर खर्च होतात. हा त्रास कमी व्हावा यासाठीच उड्डाणपूल बांधण्याची योजना आहे. या प्रस्तावीत उड्डाणपुलासाठी डीपीआर (Detailed Project Report) तयार करण्याकरिता एमएमआरडीएने निविदा काढली आहे.